पंढरपूर - माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने आवश्यकती तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. (Maghi Yatra Pandharpur) यासाठी भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
माघी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-
सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय येऊ नये यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, नगरपालिका या पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश प्रांताधिकारी गुरव यांनी दिले.
आरोग्य विभागामार्फत यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथे प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.
आवश्यक ठिकाणी बॅरेगेटींगची व्यवस्था
सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच नगरपरिषदेकडून दर्शन रांग, पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर व मंदीर परिसर येथे वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी बॅरेगेटींगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रदक्षिणामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिशा दर्शक फलक, आदी व्यवस्था करण्यात आली आहे.