माढा (सोलापूर) - माढा तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या ठिकाणी मंजूर झालेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीचे पाडकाम करून पूर्ण जागा रिकामी करण्यात येणार आहे. या जागी नवी इमारत बांधली जाणार असून यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. नव्या इमारतीच्या बांधकामादरम्यान तहसील कार्यालय तात्पुरते पर्यायी जागी स्थलांतरित केले जाणार आहे. सध्या पर्यायी जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
माढा तहसील कार्यालयाचे होणार तात्पुरते स्थलांतर, नवी इमारत बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू तहसील कार्यालयाचे येत्या काही दिवसांत स्थलांतर त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाचे येत्या काही दिवसांत स्थलांतर होणार आहे. अनेक वर्षांचे जुने तहसील कार्यालयाचे बांधकाम आता जमीनदोस्त होणार आहे. या कार्यालयास प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली असून ही इमारत शहराच्या सौंदर्यात भर पाडणारी ठरणार आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांनी माढ्यातील इंदिरा गांधी चौकात असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाची इमारत देण्याची मागणी देखील रयत शिक्षण संस्थेकडे पत्रातून केली आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्यातर्फे या कामासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवारांकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे उत्तर अद्याप तहसीलदारांना संस्थेकडून आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडीच्या उपविभागीय अभियंत्यांनीदेखील तहसीलदार राजेश चव्हाण यांना पत्र पाठवून तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयाच्या कामकाजासाठी तात्पुरती पर्यायी जागा पाहावी, असे पत्र दिले आहे. तहसील कार्यालयातील सर्वच विभागाचे दप्तर (कार्यालयीन कामकाज) जुन्या इमारतीतून दुसरीकडे स्थलांतरित केले जाणार आहे.
बांधकाम सुरू करण्यासाठी प्रकिया सुरू
'नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी प्रकिया सुरू झाली आहे. जुने बांधकाम पाडून या ठिकाणी नवी इमारत साकारली जाणार आहे. शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या इंदिरा गांधी चौकातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या ठिकाणी तहसील कार्यालयाचे कामकाज करणे सोयीस्कर होईल. त्यादृष्टीने मी पत्र पाठवून इमारतीची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र देखील प्राप्त झाले असून त्यांनी पर्यायी जागा बघण्यासाठी कळवले आहे. आमचे प्रयत्न सुरु आहेत,' असे माढाचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी म्हटले आहे.
'जुन्या इमारतीचे पाडकाम करण्याचे काम अगोदर हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी इमारत व कामकाजासाठी स्थलांतरित जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. ते झाल्यास तत्परतेने पुढील कार्यवाही होईल. नवीन इमारतीचे आराखडे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इतर बाबींची पूर्तता होऊन इमारत बांधकाम सुरू केले जाणार आहे,' असे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डुवाडीचे उपविभागीय अभियंता एन. ए. नाईकवाडी यांनी सांगितले आहे.