महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तानाजी सावंतांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर माढ्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

प्रा. तानाजी सावंत यांच्या रुपाने माढा तालुक्यास मंत्रिमंडळात प्रथमच संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे मूळगाव वाकाव या ठिकाणी व संपूर्ण तालुक्यात शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.

By

Published : Jun 16, 2019, 7:17 PM IST

सोलापूर

सोलापूर - माढा तालुक्याचे सुपूत्र, विधानपरिषदेतील शिवसेनेचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर माढा तालुक्यात जल्लोषाचे वातावरण होते. फटाक्यांची आतषबाजी करत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. सावंत यांच्या रुपाने राज्य स्थापनेपासून प्रथमच माढा तालुक्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

सोलापूर

माढा तालुक्यातील वाकाव येथील शेतकरी कुटुंबात प्रा. तानाजी सावंत यांचा जन्म झाला. माढा तालुका ही त्यांची जन्मभूमी असली तरी त्यांची कर्मभूमी पुणे हिच आहे. त्यांनी पुणे येथे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. ते यवतमाळ येथून विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत. शिवजलक्रांतीच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात फार मोठे काम उभे केले आहे.

शिवजलक्रांती घडवून ते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अंतर्गत वर्तुळात सामील झाले. त्यानंतर त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात आले. एक महिन्याच्या फरकानेच यवतमाळ येथून विधानपरिषद लढविण्याचे त्यांना उध्दव ठाकरे यांनी सांगितले. तेथे अशक्य असणारा विजय सावंत यांनी खेचून आणला. या विजयाने शिवसेनेत त्यांचे महत्त्व आणखीन वाढले होते. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर शिवसेनेने सोपवली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर निंबाळकर यांना प्रा. तानाजी सावंत यांनी एकहाती प्रचार करत निवडून आणले होते. यामुळेच त्यांचा मंत्रिमंडळात सेनेकडून समावेश झाल्याचे मानण्यात येत आहे.

प्रा. तानाजी सावंत यांच्या रुपाने माढा तालुक्यास मंत्रिमंडळात प्रथमच संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे मूळगाव वाकाव या ठिकाणी व संपूर्ण तालुक्यात शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला

ABOUT THE AUTHOR

...view details