सोलापूर - जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चार खासगी सावकारांनी 15 हजार रुपये मुद्दल व दोन महिन्यांच्या व्याजासाठी एजाज महंमद हनिफ कमिशनर (वय 25 रा. जिंदशाह मदार चौक, मुस्लिम पाच्छा पेठ) या युवकावर लोखंडी तलवारीने हल्ला करून जखमी केले. फिरोज दंडु (रा. सोलापूर), दबीर अली पटवेकर (रा. सोलापूर), अब्दुल जनाब व तन्वीर अशी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींची नावे आहेत.
15 ऑगस्ट रोजी सांयकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. जखमी युवकावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जखमी एजाज महंमद हनिफ कमिशनर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एजाज कमिशनर या युवकाने घर खर्चासाठी फिरोज दंडु व दबीर अली पटवेकर या खासगी सावकारांकडून एप्रिल 2020 रोजी 15 हजार रुपये घेतले होते. या पंधरा हजार रुपयांसाठी दरमहा 10 हजार रुपये व्याज देण्याचे ठरले होते. फिर्यादी एजाज कमिशनर या युवकाने चार महिने 10 हजार रुपये व्याज म्हणून दिले. 15 हजार रुपयांच्या बदल्यात या खासगी सावकाराने 40 हजार रुपये वसूल केले होते.
15 ऑगस्ट रोजी रात्री फिरोज दंडु, दबीर अली पटवेकर, अली जनाब व तन्वीर यांनी एजाज कमिशनर याला आणखी व्याज आणि 15 हजार मुद्दल मागू लागले. यावर फिर्यादी एजाजने स्पष्ट पणे सांगितले की, मी आजपर्यंत 15 हजारच्या बदल्यात 40 हजार दिले आहेत. आणखीन व्याज आणि मुद्दल देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावरून वाद वाढत गेला. यात चारीही संशयित खासगी सावकारांनी एजाज या युवकास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि तलवारीने पाठीत भोकसले.
जखमी एजाजला ताबडतोब सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत जेलरोड पोलीस ठाण्यात भा.द.वि. 307 व महाराष्ट्र खासगी सावकरी अधिनियम 2014 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार करत आहेत.