सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. आरोग्य प्रशासन एकीकडे आटोकाट प्रयत्न करत कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. गर्दी करू नका, असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. तरीही नागरिकांना याचे गांभीर्य नाही. या विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला तैनात केले आहे. पण पोलिसांकडून देखील कोरोना नियमावली भंग होताना दिसत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची धरपकड करून पोलीस गाडीत भरले जात आहे. आज (29 एप्रिल) सकाळी शहर पोलीस हद्दीत विजापूर नाका पोलिसांनी कारवाई केली. पण कारवाई केलेल्या सर्व जणांना एकाच गाडीत दाटीवाटीने बसवून पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले.
सार्वजनिक बसमध्येदेखील एका सीटवर एक प्रवाशी, तर पोलीस गाडीत गर्दी?
राज्य शासनाने कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळ्या नियमावली लागू केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करताना एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्याचा नियम आहे. पण सोलापूर शहर पोलीस दलाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस पकडून एकाच गाडीत बसवून पोलीस ठाण्याकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे पोलीस गाडीत गर्दी होत आहे. एकाच पोलीस गाडीत जवळपास 20 ते 30 जणांना बसवले जात असल्याचे समोर आले आहे.