सोलापूर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या आजच्या (1 ऑगस्ट) सोलापूर दोऱ्यावर प्रहार संघटनेच्या आंदोलनाचे सावट पसरले आहे. नादुरुस्त महामार्गाच्या मुद्यावरून आजचा गडकरींचा ताफा अडविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गडकरींच्या सोलापूर दौऱ्यावर प्रहारचे सावट
सोलापूर ते पुणे, सोलापूर ते येडशी आणि सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गांवर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात झाले. यात काही नागरिक मृत्यूमुखी पडले तर काही गंभीर जखमी झालेले आहेत. या संदर्भात रस्ते विभाग प्रशासनाचे प्रकल्प अधिकारी एस.एस. कदम यांना याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही कोणतिही कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी सावळेश्वर येथील टोल नाका 5 तास ताब्यात घेवून मोठ्याप्रमाणात आंदोलन करण्यात आलेले होते. तरीही तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. पुन्हा काही दिवसातच तो रस्ता हा अत्यंत धोकादायक बनल्याचे चित्र सध्या पहावयास मिळते. खराब रस्त्यामुळे तूर्तास मोहोळच्या 2 युवकांचा आणि सोलापूर शहर पोलिस दलात कार्यरत असलेले पोलीस शिपाई कैलास काकडे (नेमणुक एमआयडीसी पोलीस स्टेशन) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याचा निषेध म्हणून गडकरी यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्यात येणार आहे.
यापूर्वी केलेल्या आंदोलनावेळी व्यवस्थापक प्रकाश कुमार यांनी 7 दिवसात त्या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता चांगले करणार, असे आश्वासन दिले होते. आश्वासनाप्रमाणे काही ठिकाणी रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केल्याचे प्रथमदर्शनी दाखविण्यात आले. परंतू केलेले काम सुध्दा निकृष्ट दर्जाचे असून दुरूस्त केलेला रस्ता आता दिसेनासा झालेला आहे. फक्त तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. आता सध्या त्या 6 रस्त्यांची अवस्था फार दयनीय झाली आहे. त्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. .
दुरूस्तीच्या नावाखाली प्रकल्प अधिकारी कदम आणि संबंधित ठेकेदाराने भ्रष्टाचार केल्याचे संशय आहे. त्याचबरोबर सोलापूर ते येडशी हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनविला असून प्रकल्प अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतामुळे या रस्त्याची दीड-दोन वर्षांतच दुरावस्था झाली आहे.
या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याचा संशय प्रहारच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत उत्कृष्टपध्दतीने सुरु आहे.परंतु प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदाराच्या चुकीच्या कामकाजामुळे वरील राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनून राहिल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.