सोलापूर - सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करणारा शेतकरी आता सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे पुरता आर्थिक अडचणीत सापडला आहे. लॉकडाउनमुळे रस्त्यावर फळे आणि भाजीपाला वाहतूक करणारी वाहने नाहीत. तर दुसरीकडे कृषी बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातल्या कुरुलचे शेतकरी रमेश रामचंद्र पाटील यांनी आपल्या शेतातील दीड एकर एकरावरील पपईची बाग जागेवर सडून गेली आहे. त्यामुळे पपई उत्पादनातून मोठी अपेक्षा असलेल्या रमेश पाटील यांचा कोरोनाने भ्रमनिरास केला आहे.
कहर कोरोनाचा: पपईची संपूर्ण बाग जाग्यावर सडली, शेतकऱ्याला लाखोंचा फटका
लॉकडाउनमुळे रस्त्यावर फळे आणि भाजीपाला वाहतूक करणारी वाहने नाहीत. तर दुसरीकडे कृषी बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातल्या कुरुलचे शेतकरी रमेश रामचंद्र पाटील यांची दीड एकरावरील पपईची बाग जागेवर सडून गेली आहे.
गेल्यावर्षी नव्वद हजार रुपये खर्च करून पाटील यांनी नवा प्रयोग म्हणून, पपईची बाग लावली होती. अपेक्षेप्रमाणे बाग बहरली. उत्पादन चांगलं झालं पण अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे बाजार पेठ बंद झाल्या. व्यापाऱ्यांनी ऐनवेळी माल उचलण्यास नकार दिला. परिणामी आलेले फळ जागेवर सडून गेले आहे.
आज कोरोनाचे संकट संपूर्ण जगासमोर उभं असल्याने सहनशील बळीराजाने ही प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन नातेवाईक आणि गावकऱ्यांसाठी आपल्या फळबागा खुल्या केल्या आहेत. पण झालेला खर्चापोटी सरकारने इतर उद्योगांप्रमाणे शेती उद्योगाला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.