सोलापूर- हॉटेल चालक महिलेची दीड कोटींची फसवणूक झाल्याने सर्जन डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये डॉ. सुनील वासुदेव तडवळकर (रा. करुणा सोसायटी, अंतरोळीकर नगर, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. स्वाती शरद चव्हाण(वय-32, रा. मंगलगिरी टॉवर, होटगी रोड, सोलापूर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. फिर्यादी महिलेची बहीण डॉ. सुनील तडवळकर यांच्या समाचार चौक(शुक्रवार पेठ) येथे असलेल्या दवाखान्यात नोकरीस होती. त्यामुळे स्वाती चव्हाण बहिणीकडे भेटायला जात होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून फिर्यादी स्वाती या महिलेचे तडवळकर हॉस्पिटल येथे जाणे येणे होते. यामधून स्वातीची ओळख सर्जन डॉ. सुनील तडवळकर सोबत झाली होती. या ओळखीचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले होते. 2013 साली मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. सुनील तडवळकर यांनी स्वाती चव्हाण यांच्याकडून 35 लाख रुपये घेतले होते. 15 एप्रिल 2017 रोजी डॉ. तडवळकर यांचे वडील वासुदेव तडवळकर यांनीदेखील स्वातीकडून 10 लाख रुपये हाथउसने घेतले होते. ही रक्कम घेताना वासुदेव तडवळकर यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लेखी जबाब लिहून दिला होता की, आमचा विद्यानगर येथील बंगला विक्री केल्यानंतर 10 लाख रुपये परत देतो. पण बंगला विक्री केल्यानंतरदेखील 10 लाख व 35 लाख रुपये ही रक्कम परत दिली नाही.
हॉटेलचालक महिलेची दीड कोटींची फसवणूक; सर्जन डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. सुनील तडवळकर यांनी स्वाती चव्हाण यांच्याकडून 35 लाख रुपये घेतले होते. 15 एप्रिल 2017 रोजी डॉ. तडवळकर यांचे वडील वासुदेव तडवळकर यांनीदेखील स्वातीकडून 10 लाख रुपये हाथउसने घेतले होते.
त्यानंतर संशयित आरोपी डॉ. सुनील तडवळकर यांनी खासगी दवाखाना उभा करण्यासाठी पुन्हा स्वाती शरद चव्हाणकडून 12 लाख रुपये उसने घेतले आणि नंतर पुन्हा 3 लाख रुपये घेतले. हा दवाखाना उभा झाल्यानंतर काही दिवसांनी रुग्णांच्या तक्रारी वाढल्याने हा खासगी दवाखाना बंद करण्यात आला. स्वाती चव्हाण आणि डॉ. सुनील तडवळकर यांची ओळख 2002 पासून झाली होती. तेव्हापासून आजतागायत डॉ. सुनील यांनी स्वाती चव्हाणकडून वेळोवेळी हाथ उसने रक्कम घेत 1 कोटी 50 लाख रुपये घेतले आहेत आणि त्याबद्दल 3 बीएचके फ्लॅट देतो असेदेखील लेखी लिहून दिले आहे. अशा आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोल्हाळ करत आहेत.