सोलापूर - लॉकडाऊनच्या काळात शहरातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजूंना आरोग्य तपासणी करणे शक्य व्हावे, म्हणून फिरता दवाखाना (मोबाईल डिस्पेन्सरी)सुरू करण्यात आली. सोलापूर जिल्हा प्रशासन, सोलापूर महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरात मोबाईल डिस्पेन्सरीची सेवा सुरू या फिरत्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर आजारी व्यक्तींच्या घरात जाऊन तपासणी करणार आहेत. शहर हद्दीतील गावठाण भागात सकाळी 10 ते 2 तर जुने सोलापूर परिसरात दुपारी 2 ते 6 या कालावधीत हा दवाखाना उपलब्ध असेल. या दवाखान्यातून दिली जाणारी वैद्यकीय सेवा मोफत आहे. रुग्णांनी श्याम पाटील (8999908660) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
या स्वरुपाच्या वैद्यकीय सेवेची व्याप्ती वाढवण्याचा जिल्हा प्रशासन विचार करत आहे. वैद्यकीय सेवा देण्यासाठी इच्छुक असणारे डॉक्टर आणि परिचारक यांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष केतन शाह यांनी केले.
या मोबाईल डिस्पेंन्सरीच्या कामकाजाला जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष केतन भाई शहा, श्याम पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप कुमार ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 39 गुन्हे दाखल करण्यात आले असून एकून 197 जणांना अटक करण्यात आलेली आहे. शहरात आणि जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्या एकूण 2 हजार 250 वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.