सोलापूर -माघ महिन्यात सोलापूरहुन पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यातील रिंगणात धावणाऱ्या अश्वाचे आज(सोमवारी) सोलापुरात पूजन करण्यात आले. माघवारी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष तथा ह.भ.प. महेश महाराज जाधव यांच्या हस्ते या अश्वाचे पूजन करण्यात आले, तसेच अश्वाचा सरावही करुन घेण्यात आला.
या वारकऱ्यांच्या दिंडीला २०० वर्षांची परंपरा आहे. माघवारी पालखी सोहळ्यातील सर्वांचे आकर्षण असणारा गोल रिंगण सोहळा यंदा ३१ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता नॉर्थकोट प्रशाला येथे पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर यांच्या माध्यमातून होम मैदान या ठिकाणी माघवारी पालखी सोहळ्यातील रिंगणाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. यावेळी वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे, ह.भ.प.ज्योतीराम चांगभले, ह.भ.प.बळीराम जांभळे, ह.भ.प.संजय पवार, ह.भ.प. अरुण महाराज आवताडे, मोहन शेळके, महेश चोरमुले, विष्णूपंत मोरे, सोमनाथ ताकमोगे आदी उपस्थित होते.