पंढरपूर -उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याद्वारे 22 गावातील शेतीसाठी उजनीतून 5 टीएमसी पाणी उचलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे.
मात्र सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इंदापूर तालुक्याला मिळणार असल्याने, सोलापूरकरांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दत्तात्रय भरणे हे सोलापूरचे पालकमंत्री असून देखील सोलापूरच्या वाट्याचे पाणी ते दुसऱ्या तालुक्याला देत आहेत, त्यामुळे सोलापूरकरांनी त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उजनी धरण कायमच चर्चेत
दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात उसाची शेती वाढवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे धरण म्हणून उजनी धरणाचा उल्लेख होतो. उजनी धरणाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ मिटावा म्हणून उजनी बांधण्यात आले. 1980 साली उजनी धरण बांधून पूर्ण झाले. त्यानंतर सोलापूरसाठी वरदान ठरलेल्या धरणातून पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सोलापूर जिल्ह्यातील शेतीला दिले जात आहे. मात्र दुष्काळात उजनीच्या पाण्याचे नियोजन असो, किंवा उजनी धरणाच्या पाणीवाटपाचा प्रश्न असो उजनीच्या पाण्यावरून राज्यातील राजकारण जोरात चालू असते. तर कधी उजनीच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणाबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा उजनी चर्चेत आले आहे.