पंढरपूर -शिक्षणाचा प्रवाहात असणारा माणूस हा ज्ञानाने परिपूर्ण होतो असे म्हटले जाते. शासनाकडून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील 92 व्या वर्षी आजोबांना पीएचडी प्रदान ( 92 Year Old Man Get PhD ) केली. लालासाहेब बाबर यांनी 92 व्या वर्षी सामाजिक कार्याच्या सन्मानार्थ ही पदवी बहाल करण्यात आली. कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाची पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. 92 वर्षाचे आजोबा हे अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या युवकांसाठी आयकॉन ठरत आहे.
आयुष्यभर गांधी विचारसरणीचा आधार -
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद या लहानशा गावांमध्ये लालासाहेब बाबर हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य उच्चशिक्षित आहे. लालासाहेब बाबर यांचा जन्म मध्यप्रदेश मधील ग्वालियर(ग्वाल्हेर) येथे 1 जानेवारी 1930 मध्ये झाला. त्यांचे वडील माधवराव बाबर हे ग्वालियर येथील सिंधिया(शिंदे) संस्थान मध्ये हत्तीखाना व घोडदळ विभागाचे सरसेनापती म्हणून कार्यरत होते. बालपण राजेशाही परिवारासोबत अनुभवता आले. त्यानंतरचे शिक्षण सोनंद येथील शाळेत झाले.त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ मोठया प्रमाणात सुरू होती. लहानपणापासूनच लालासाहेब बाबर यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते. त्यातून त्यांनी आयुष्यभर गांधी विचारसरणीचा आधार घेतला.
सरपंच म्हणून काहीकाळ सांभाळला पदभार -
लालसाहेब बाबर यांनी समाजामध्ये घडणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लालासाहेब बाबर यांनी 1946 ते 47 मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. मानेगाव या ठिकाणी शाळा सुरू करून त्यांनी अध्यापनाच्या महान कार्यास सुरवात केली. समाजसेवा करता यावी म्हणून नोकरीचा 1950 मध्ये राजीनामा देऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. सोनंद गावचे सरपंच म्हणून पदभार हाती घेतला. त्यांनी ग्रामीण भागातील समस्यांकडे दूरदृष्टीने पाहिले.
गावात विविध उपक्रम -
1952 मध्ये तंटामुक्ती गाव अभियान योजना सोनंद ग्रामपंचायतीमध्ये अंमलात आणली. गावातील अनेक न्यायालयीन प्रकरण किंवा पोलीस स्टेशनमधील प्रकरण गावांमध्ये मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गावांमध्ये कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून गाव भयमुक्त करण्याचा प्रयत्न केला. गाव स्वच्छ करण्यासाठी गाडगेबाबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार त्यांनी गावामध्ये केला आणि गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला.