पंढरपूर -तालुक्यातील वाखरी येथे ग्रामपंचायत शिपाई यांचा वाढदिवस साजरा करणे गावातील उपसरपंचाला महाग पडलं आहे. वाखरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौथाऱ्यावर मोटर सायकलवर केक ठेऊन उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून ग्रामपंचायत शिपाई जितेंद्र कोरे यांचा वाढदिवस साजरा केला होता. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात उपसरपंचासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गावचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात 295, 188,269 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये उपसरपंच संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संजय विठ्ठल लेंगरे, योगेश पांढरे, शंकर महादेव सलगर, विठ्ठल परमेश्वर लोखंडे, सुधाकर मधुकर शिंदे, रोहित पांडुरंग गायकवाड, विश्वास लक्ष्मण कोळी, शिवाजी रंगनाथ हाके, किरण सुखदेव कांबळे, शिपाई जितेंद्र उर्फ नाना दिगंबर पोरे (रा. वाखरी ता. पंढरपूर) यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावचे पोलीस पाटील बाळू गौतम शेंडे यांनी फिर्याद दिली आहे.