सोलापूर- पावसाला सुरुवात झाली, तशी शेतकऱ्यांची खरिपाची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामात सोयाबीन पीक घेण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अर्धा जून महिना संपत आला, तरी सोयाबीनचे बियाणे बाजारात उपलब्ध होत नाही. बाजारात सोयाबीनचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीनची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागे काही वर्षात या तालुक्यातील शेतकरी हे सोयाबीन पीक घेत आहेत. चालू वर्षात देखील शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाची लागवड करण्याकडे कल दिसतो. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करण्याचे नियोजन केले असले, तरीही बाजारात महाबीज या सरकारी कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नाही. बाजारात बियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मागील वर्षीचे घरात असलेले बियाणे पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा; घरगुती बियाणे पेरणीकडे शेतकऱ्यांचा ओढा उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळासाहेब शिंदे या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात सोयाबीनची पेरणी करण्याचे ठरवले आहे. सोयाबीनची पेरणी करण्यासाठी त्यांनी त्यांचे नऊ एकर क्षेत्र हे पेरणीसाठी तयार केले आहे. मात्र बाजारात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या शेतात सोयाबीनचे घरगुती बियाणे पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात सोयाबीनचे बियाणे मिळत नसल्यामुळे बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या पाहुण्याकडून 45 रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे बियाणे विकत घेतले आहे. बाळासाहेब शिंदे यांना 9 एकर सोयाबीनची पेरणी करण्यासाठी अडीच क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार होते. घरगुती बियाणे ते पेरणार आहेत.
बाळासाहेब शिंदे यांच्याप्रमाणेच याच गावातील तरुण शेतकरी अनिल खंडागळे यांनी देखील सोयाबीनची पेरणी करण्यासाठी शेताची मशागत पूर्ण केली आहे. खंडागळे हे चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. त्यांनादेखील बाजारामध्ये सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात मागील वर्षी झालेल्या सोयाबीनच्या उत्पादनातील काही सोयाबीन हे काढून ठेवले आहे. तेच घरगुती सोयाबीन आता बियाणे म्हणून पेरणार असल्याचे अनिल खंडागळे यांनी सांगितले आहे.
मागील वर्षी उत्पादित झालेल्या सोयाबीनमधूनच एकरी 25 किलो याप्रमाणे बियाणे बाजुला काढून ठेवले होते आणि घरगुती सोयाबीनची बियाणे पेरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. बियाणे घरगुती असले, तरी चांगला उतारा मिळत असल्याचे खंडागळे म्हणाले.