महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यास केले जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस त्याच्याकडून 11 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

police and accused
चोरटा व दुचाकीसह पोलीस

By

Published : Sep 10, 2020, 7:10 PM IST

Updated : Sep 10, 2020, 8:41 PM IST

सोलापूर- दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 11 लाख 45 हजार रुपयांच्या एकुण 25 मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत. परशुराम शिवाजी मोरे (वय 25 वर्षे, रा. कलहिप्परगा, ता.अक्कलकोट, जि सोलापूर), असे त्या चोरट्याचे नाव असून हा चोरटा विविध जिल्ह्यातून दुचाक्या चोरून कर्नाटकातील विविध जिल्ह्यात विकत होता. या चोरट्याच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.

बोलताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील

पोलीस अधीक्षक मनोज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत चोरट्याने सोलापूरच्या ग्रामीण भागात दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्याचा शोध घेत होते. दरम्यान, कलहिप्परगा येथील एका पोलीस पाटलाने पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांना दिलेल्या माहिती वरुन अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावला होता. त्या ठिकाणी तो येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अनेक वाहने चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता त्याने 25 दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. या 25 दुचाक्या सोलापूर शहर व जिल्हा, उस्मानाबाद, पुणे व कर्नाटकातून चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. कर्नाटकातील विविध जिल्ह्यात जाऊन ही वाहने फायनान्सच्या लिलावातून घेतली आहेत, त्यामुळे नंतर कागदपत्रे देतो, अशी थाप मारत होता. पोलिसांनी ही सर्व वाहने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले आहेत. त्याच्याविरोधात मुंबई, ठाणे, कर्नाटकातील विजयपूर या ठिकाणी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, दिलीप राऊत, मोहन मानसावाले, अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, विलास पारधी आदींच्या पथकाने केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

दरम्यान, दुचाकीधारकांनी हँडल लॉक लावावा तसेच आणखी कोही विशेष लॉक असतील तर ती लावावित. जर कोणी कमी किंमतीत वाहने विकत असतील तर त्यांच्याकडून वाहनांची खरेदी करु नये, असे आवाहन नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.

हेही वाचा -सोलापुरात शेळीपालन घोटाळा; कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून आरोपी फरार

Last Updated : Sep 10, 2020, 8:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details