सोलापूर - रेल्वे खासगीकरणच्या विरोधात माजी आमदार नरसैया आडम यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करण्यासाठी परवानगी नसल्याने आडम यांच्यासह सिटूच्या १३८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी बोलताना सोन्याची अंडी देणाऱ्या रेल्वेचे खासगीकरण हाणून पाडा, असे आवाहन कॉ. नरसैया आडम यांनी केले आहे.
भारत सरकारने १०९ रेल्वेमार्गावर १५१ खासगी रेल्वे गाड्या चालवण्यासाठी देशी-विदेशी खाजगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वीच सरकारने रेल्वे इंजिन व बोगीचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नलचे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. आता क व ड गटाची रिक्त असलेली ५० टक्के पदे रद्द करण्याचा व नवीन पदनिर्मिती वर प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार ४०० रेल्वे स्टेशनचे जमिनीसह खासगीकरण करणार आहे. रेल्वे डबे कारखाना व इंजिन कारखाना खासगीकरण करून त्याला वेगळे करून शेअर्स मार्केटमध्ये त्याचे शेअर्स ठेवणार आणि त्याचे खासगी कंपनीत रुपांतर करणार. खरे पाहता रेल्वे तिकीट दरामध्ये ४७ टक्के अनुदान आहे. या रेल्वेमधून दरवर्षी सरकारला मोठा महसूल मिळतो.