पंढरपूर -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑटो रिक्षा चालकांना शासनाकडून 1500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. परवानाधारक रिक्षा चालकांना आवश्यक माहिती ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे. तालुक्यातील परवानाधारक ऑटो रिक्षा चालक अनुदानापासून वंचित राहु नये, यासाठी तहसील कार्यालयात ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरु करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
रिक्षा चालकांना अनुदानासाठी तहसील कार्यालयात नोंदणी सुरु, अडीच हजार रिक्षा चालकांना होणार लाभ
ऑटो रिक्षा चालकांना शासनाकडून 1500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. परवानाधारक रिक्षा चालकांना आवश्यक माहिती ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे. तालुक्यातील परवानाधारक ऑटो रिक्षा चालक अनुदानापासून वंचित राहु नये, यासाठी तहसील कार्यालयात ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरु करण्यात आली आहे.
रिक्षा चालकांची कोरोना चाचणी बंधनकारक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून निर्बंध जाहीर करण्यात आले असल्याने सेतू केंद्र बंद असल्याने रिक्षा चालकांची गैरसोय होवू नये यासाठी तहसील कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. तालुक्यात सुमारे 2 हजार 500 ऑटो रिक्षा चालक परवानाधारक असून, ऑनलाईन नोंदणीसाठी आलेल्या प्रत्येक परवानाधारक रिक्षा चालकांची कोरोना चाचणी घेवूनच तहसील कार्यालयात प्रवेश दिला जात आहे. अनुदान नोंदणीसाठी परवानाधारक रिक्षा चालकांनी आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक, वाहन चालविण्याचा परवाना, अनुज्ञप्ती क्रमांक आवश्यक आहे. संबधित कागदपत्राची संगणक प्रणालीवर प्रमाणित झाल्यानंतरच रिक्षा चालकांच्या खात्यात तात्काळ 1500 रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले आहे.
कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश
तालुक्यातील परवानाधारक रिक्षा चालकांनी संगणक प्रणालीव्दारे सानुग्रह अनुदान अर्ज नोंदणी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयत उपस्थित रहावे. तसेच कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क व सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहनही तहसीलदार बेल्हेकर यांनी केले आहे.