सोलापूर - शिवसेनेचा नवा चेहरा लोकांमध्ये जावा यासाठीच शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पुत्र आदित्यला मक्याचे लोणचे आणि महाप्रसाद घेऊन ग्रामीण महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाठवले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आदित्य ठाकरेच्या राजकीय प्रवेशाची नांदी लोकसभेपूर्वीच्या दौऱ्यात आदित्य यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांना मक्याचे लोणचे (मूरघास) आणले होते. तर आता विधानसभेपूर्वी थेट पशुपालक शेतकऱ्यांसाठी त्यांनी महाप्रसाद आणला आहे. आदित्यची पाठराखण करणारी भक्कम टीम देत सेनेने नव्या पक्षनेतृत्वाची रंगीत तालीम सुरु केली आहे, अशी चर्चाही शिवसैनिकांत आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना छेडले असता त्यांनी राजकीय प्रश्नाला बगल दिली आहे.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चारा छावण्यांमधील पशुपालकांसाठी बाळासाहेब ठकरेंच्या नावे महाप्रसाद योजना सुरु केली आहे. यापूर्वी त्यांनी छावण्यांमधील जनावरांना मक्याचे लोणचे आणले होते. त्याचे कौतुकही झाले. पण आता पावसाळ्याच्या तोंडावर महाप्रसाद कशासाठी याचे उत्तर सेना नेत्यांकडे नाही. म्हणून या योजनेच्या विलंबला प्रशासन जबाबदार असल्याचे कारण सेनेचे स्थानिक सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी दिली.
स्पष्ट उत्तर देणे आदित्य टाळत असले तरी एकूणच मुंबईत आदित्य ठाकरेंना भविष्यात आपल्या वडिलोपार्जित पक्षाची धुरा सांभाळायची आहे. ती सांभाळताना त्यांना अडचण येऊ नये तसेच राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. या दोन्हीचा ताळमेळ घालत दुष्काळाचा हंगाम संपत आला तरी सेनेचा युवा नेता लोकांत जायचा इव्हेंट घेत आहे.