सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या विद्यार्थिनीच्या डोंगर माथ्यावरील ऑनलाइन अभ्यासाची बातमी 'ईटीव्ही भारत'वर प्रसारित झाली होती. त्यानंतर या बातमीची दखल घेत व स्वप्नालीच्या अडचणींवर मात करण्याची जिद्द पाहून भारत नेटच्या टीमने तिच्या घरापर्यंत इंटरनेट पोहोचवले आहे.
प्रतिक्रिया देताना स्वप्नाली सुतार व भारत नेटचे कोकण विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित स्वप्नाली ही मुंबईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमुळे ती गावात अडकली होती. यावेळी इंटरनेट नसल्याने तिला ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते. मात्र, हार न मानता तिने गावातील उंच डोंगरावर जाऊन नेटवर्क मिळवला व तेथून तिने अभ्यासाला सुरुवात केली होती. येथे तिच्यासाठी झोपडी बांधण्यात आली. या झोपडीत बसून ती अभ्यास करायची. तिला पूर्ण दिवस झोपडीत बसून अभ्यास करावा लागत होते. तिचे कष्ट जेव्हा विविध वाहिन्यांवरती व वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये प्रसारित झाले तेव्हा त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने त्वरित घेतली. यानंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सीएससी ई-गव्हर्नन्सचे सीईओ डॉ. दिनेश त्यागी, राज्य समन्वयक वैभव देशपांडे, कोकण विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित यांचा प्रतिसाद आणि प्रयत्नांमुळे स्वप्नालीची समस्या दूर झाली आहे.
काही दिवसापूर्वी भारत नेटचे पथक दारिस्ते या दुर्गम गावात पोहोचले. पथकाने सर्वप्रथम ग्रामपंचायत दारिस्ते येथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी जोडण्याचे पहिले उद्दिष्ट ठरवले. केंद्र स्तरावरून आणि राज्य स्तरावरून तांत्रिक मदत टीमला मिळाल्यामुळे सायंकाळपर्यंत ग्रामपंचायत येथे इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आले. मग ग्रामपंचायत येथे सरपंच आणि गावातील ग्रामस्थ आणि स्वप्नालीचे नातेवाईक यांच्याशी चर्चा करून दुसऱ्या दिवशी स्वप्नालीच्या घरापर्यंत इंटरनेट स्थापन करण्यात आले. रविवार सकाळपासूनच ऑप्टिकल फायबर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ओढत नेऊन स्वप्नालीच्या घरी सर्व अडथळ्यांना पार करत अखेर इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आले, अशी माहिती भारत नेटचे कोकण विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित यांनी दिली.
दोन दिवसांच्या धडक कारवाईमुळे स्वप्नाली काल सकाळपासून स्वतःच्या घरात बसूनच बक्षीस म्हणून मिळालेल्या लॅपटॉप व मोबाईलद्वारे कॉलेजमधील सर्व ऑनलाइन क्लासेसला हजर राहू लागली आहे. तिच्या पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. केंद्र सरकारच्या भारत नेट प्रकल्पांतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याचे ठरले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींपैकी ३६१ ग्रामपंचायती या फेज वनमध्ये समाविष्ट असून टप्प्याटप्प्याने या सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडून सर्वांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारतातील ग्रामीण भागसुद्धा अशाप्रकारे जगाशी जोडला जाणार आहे. स्वप्नालीला या योजनेचा लाभ झाल्याने तिचा ऑनलाइन अभ्यास घरूनच सुरक्षितपणे सुरू झाला आहे. सर्व ग्रामपंचायत जोडल्या गेल्याने कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमध्येसुद्धा विद्यार्थ्यांचा अभ्यास अखंडित राहणार आहे. आपली समस्या समजून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना केल्याने स्वप्नालीनेही सर्वांचे आभार मानले आहे. ती म्हणाली, बातमी आल्यानंतर आपल्याला सर्वांनीच अपेक्षेपेक्षा जास्त मदत केली आहे. तेव्हा सर्वांचे आभार, अशा शब्दात स्वप्नालीने सर्वांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, स्वप्नालीच्या या जिद्दीला सलाम करतानाच तिला आशीर्वाद देण्यासाठी 'आम्ही कणकवलीकर' परिवार सरसावला आहे. या परिवाराकडून एक लॅपटॉप तिला तिच्या जिद्दीचे बक्षीस म्हणून सुपूर्द करण्यात आला आहे. स्वप्नालीच्या ज्ञान संपादन करण्याचा अथक प्रयत्न हा दुर्गम भाग जगाच्या नकाशावर पोहोचवणारा आहे. 'आम्ही कणकवलीकर' यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, डॉ. सुहास पावसकर, बाळू मेस्त्री, विजय गावकर, हनीफ पिरखान, डी.बी. तानवडे, संजय मालंडकर आणि ऋषिकेश कोरडे यांनी स्वप्नालीच्या जिद्दीला सलाम करीत लॅपटॉप तिच्याकडे सुपूर्द केला.
हेही वाचा-नारायण राणे यांच्या ज्योतीष व्यवसायाला माझ्या शुभेच्छा - परिवहन मंत्री अनिल परब