मुंबई -सिंधुदुर्गमधील ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत , मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात -
वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात व जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे होईल. सर्व सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल. त्यामुळे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱयांनी आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावाने असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू करावी. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता याबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करावा, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.