सिंधुदुर्ग -१५ ऑगस्ट २०२२ पर्यंत मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल. गोवा आणि सिंधुदुर्गच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असेल. असे सांगतानाच गोवा मुक्तीच्या आधीपासून सिंधुदुर्ग आणि गोव्याचे नाते आहे, हे नातं आणखी वृद्धिंगत होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना व्यक्त केले आहे.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सिंधुदुर्ग साठीही महत्त्वाचे
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरु करण्याची आमची इच्छा आहे. मला खात्री आहे की 2022 पर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण होईल. हे विमानतळ जिल्ह्यातून अगदी जवळ असलेल्या मोपा गावात होत असल्याने, हे विमानतळ गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा असे दोघांसाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे, असेही यावेळी सावंत म्हणाले.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरू होणार स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोवा व सिंधुदुर्गचे नाते
यावेळी त्यांनी बोलताना गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे नाते असल्याचा आवर्जून उल्लेख केला. गोवा मुक्तीसंग्रामाच्या वेळी या भागातील लोकांनी आणि स्वातंत्र्यसेनानींनी आम्हाला मोठं सहकार्य केलं, त्यासाठी सिंधुदुर्ग वासियांना धन्यवाद. हे नाते आणखी वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही यावेळी सावंत यांनी म्हटले आहे. आरोग्य सेवेसाठी सिंधुदुर्ग गोव्यावर अवलंबून आहे, असे म्हटले जाते. मात्र त्याहीपेक्षा अधिक पटीने आम्ही सिंधुंदुर्गावर अवलंबून आहोत. मटण, चिकन, भाजी यासारख्या अनेक गोष्टींसाठी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अवलंबून आहोत. असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.