सिंधुदुर्ग - कणकवली बाजरपेठेत सोमवारी पहाटे ३ दुकानांना आग लागली. कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊसचे दुकान जळून खाक झाले. त्या शेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घरालाही आगीची मोठी झळ पोहोचली आहे. सुदैवानै या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कणकवलीमध्ये बाजारपेठतल्या झेंडाचौकात भीषण आग पहाटे ३ वाजताच्या सुमारास लागली आग-
कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पहाटे ५.३० पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस मधून मोठ्या प्रमाणत धुराचे व आगीचे लोट येवू लागले. या दरम्यान शेजारील राहत्या घरातील नागरिकांना याबाबत कल्पना आल्यानंतर त्यानी तात्काळ आरडाओरडा केला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती.
कणकवलीच्या बाजारपेठतील झेंडाचौकात भीषण आग आगीत लाखो रुपयांचे नुकसान-
या आगीची माहिती मिळाल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तातडीने नगर पंचायतीच्या अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर मागवत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र आग आटोक्यात येत नव्हती भर बाजारपेठेत हे अग्नी तांडव सुरु झाल्याने आकाशात धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. या आगीत लाखों रुपयेचे नुकसान झाले आहे. तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आदींनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी मदतकार्यसुरू केले.