सिंधुदुर्ग -एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी पाठवून कोरोनाग्रस्तांचा आकडा फुगवण्यास एसटी प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. तसेच जोपर्यंत याबाबत योग्य शासन निर्णय येत नाही, तोपर्यंत एसटी महामंडळाचे डेपोचे गेट उघडणार नाही, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, भाजपनेही कुडाळ येथील एसटीचे २० कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने निदर्शने केली.
एसटी डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराला ठोकल टाळं -
बेस्ट सेवेसाठी कुडाळ डेपोतून 48 कर्मचारी पाठवण्यात आले होते. ते जिल्ह्यात परत आल्यावर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीत 20 कर्मचारी पॉझिटिव्ह आले. यापूर्वीही परत आलेल्या 5 कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाली होती. इतके सगळे होऊनही पुन्हा कर्मचाऱ्यांना मुंबईत पाठवण्यात येत असल्यामुळे आक्रमक झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ एसटी डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह परिवहन कामगार सेनेचे बनी नाडकर्णी यांना ताब्यात घेतले.
एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत नेणे थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरून मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिला. यावेळी पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपाध्यक्ष जगन्नाथ उर्फ बनी नाडकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर आदींना ताब्यात घेतले.
हेही वाचा -केवळ 17 दिवसांत राज्यात 1 लाख 22 हजार 43 घरांची विक्री, महिनाअखेरीस रेकॉर्ड ब्रेक गृहविक्रीची शक्यता
भाजपचीही निदर्शने -
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनीही कुडाळ एसटी डेपोत निदर्शने केली. कोरोनामुक्त झालेल्या कुडाळमध्ये पुन्हा रूग्ण वाढण्यास एसटी प्रशासनच जबाबदार आहे. एसटीचे चालक मुंबईत पाठवण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता थांबा आणि योग्य तो निर्णय घ्या, अशी मागणी कुडाळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे केली. तसेच याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करु, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी दिला.
मुंबईत पाठविण्यात आलेले तब्बल 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. इकडे कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, हा प्रकार म्हणजे तालुक्याला कोरोनाग्रस्त करण्यासारखा आहे. त्यामुळे याबाबत योग्य नियोजन करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.