सिंधुदुर्ग -गोव्यातून मणेरी येथे येऊन होम क्वारंटाईन असलेली तीन कुटुंबे प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पुन्हा गोव्यात गेल्याने खळबळ उडाली आहे. मणेरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी नागरिकांच्या घरांना भेट दिल्या असता हा प्रकार उघडकीला आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ याबाबतची माहिती कोरोनासाठी नेमलेल्या ग्राम नियंत्रण समितीला आणि वरिष्ठांना दिली.
ग्राम नियंत्रण समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधीर नाईक आणि ग्रामस्थ भगवान गवस यांनी ही माहिती तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिली. ९ लोक असलेल्या या तीन कुटुंबांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
गोव्यातील डिचोली, मुरगाव वास्को, दाबोली वास्को या ठिकाणांहून ही तीन कुटुंबे मणेरी तेलीवाडी येथे आली होती. त्यातील चौघांना ३ ऑगस्टपासून तर अन्य ५ जणांना ५ ऑगस्टपासून १४ दिवसांसाठी आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले होते. सकाळी आरोग्य अधिकारी प्रदीप ठोंबरे, आरोग्य सेविका रुपाली पिंगुळकर आणि आशा स्वयंसेविका त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना होम क्वारंटाईन केलेले नागरिक घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आणखी चौकशी केली असता ते सर्वजण काही दिवसांपूर्वी पुन्हा गोव्याला गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मणेरी गावातील नागरिकांप्रकरणी आपल्याकडे लेखी तक्रार आली आहे. त्या आधारे कारवाईसाठी पोलिसांकडे प्रस्ताव पाठवणार आहे, असे दोडामार्गचे प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी सांगितले.