सिंधुदुर्ग - जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरच्या एकूण 144 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. तर आहे. 447 घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जोरदार पाऊस अजूनही सुरु आहे. तसेच जिल्ह्यात सुमारे 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. मालवण तालुक्यातील आचरा जामडूल, गाउडवाडी भागात उधाणाचे पाणी अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित झाला असून तो सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
जिल्ह्यात आज एकूण 94 पूर्णाक 5 मिलीमीटर पावसाची नोंद -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एकूण 94 पूर्णाक 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 05, सावंतवाडी – 15, वेंगुर्ला – 23, कुडाळ 6.5, मालवण – 12, कणकवली – 13, देवगड – 15, वैभववाडी – 05 असा एकूण 94 पूर्णांक 5 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सरासरी 11.81 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. फोंडा तसेच करूळ घाटातही झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरच्या एकूण 137 कुटुंबाचे स्थलांतरण करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात तौक्ते चक्रीवादळाचा कहर सोमवारीही जिल्ह्यात वादळाचा धोका -प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार उद्या सोमवार दिनांक 17 मे रोजी ताशी 70 ते 80 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तर मालवण ते वसई या समुद्र किनाऱ्यावर 3.3 मीटर ते 6.2 मीटर उंचीच्या लाटा सोमवार 17 मे रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत उसळणार आहेत. तसेच वेंगुर्ला ते वास्को या किनारपट्टीवर लाटांची उंची 3.2 मीटर ते 6.0 मीटर इतकी असणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी तसेच मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्राच्या जवळ लाटा पाहण्यासाठी उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आठही तालुक्यात मोठे नुकसान -वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 160 घरांचे नुकसान झाले आहे. 15 गोठ्यांचे, 2 शाळांच्या नुकसानीची माहिती आहे. 3 विजेचे खांबही पडले आहेत. तसेच एक स्मशानभूमी शेड आणि एक शेळीपालन शेडचेही नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्यात 90 घरांचे, 10 गोठ्यांचे, एका शाळेचे, 4 शासकीय इमारतींचे, एका शेडचे नुकसान झाले आहे. तसेच 6 विजेच्या खांबांचेही नुकसान झाले आहे. 6 ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडली आहे. सावंतवाडी तालुक्यात 57 घरांचे, 3 गोठ्यांचे, 2 शेडचे आणि 2 विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. तसेच 57 ठिकाणी झाडे पडली आहेत. कुडाळ तालुक्यात 43 घरांचे, 3 गोठ्यांचे, 4 शेडचे आणि 3 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तालुक्यात 12 ठिकाणी विजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. 53 ठिकाणी झाडे कोसळली आहेत. वेंगुर्ला तालुक्यात 40 घरांचे, 2 गोठ्यांचे आणि 6 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तर 5 ठिकाणी झाडे पडली आहेत. मालवण तालुक्यात 34 घरांचे, एका गोठ्याचे, एका शेडचे नुकसान आणि 3 ठिकाणी झाडे पडली आहेत. तर एका विद्युत वाहिनीचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात 22 घरांचे, 3 गोठ्यांचे आणि एका शासकीय इमारतीचे नुकसान झाले आहे. एका विद्युत वाहिनीचे नुकसानीबरोबरच 6 ठिकाणी झाडे पडली आहेत. दोडामार्ग तालुक्यात एका घराचे नुकसान झाले आहे तर 8 ठिकाणी झाडे पडली आहेत.
वीज पुरवठा खंडित, सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू -वादळ रत्नागिरीकडे सरकले असले तरी जिल्ह्यातील धोका अजून टळलेला नाही. जोरदार पाऊस व वेगवान वारे सुरूच आहेत. तसेच सीसीसी आणि कोविड रुग्णालय येथे जनरेटर कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. तहसिलदार यांनी अतिरिक्त डिझेलचा साठा करून ठेवावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या आहेत. जणेकरून गरज भासल्यास डिझेलच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. इतर ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. विद्युत वितरण विभागाचेही या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.