सिंधुदुर्ग - जिल्ह्यात दिल्ली, गोवा, राजस्थान, केरळ या ठिकाणांहून येणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात येणार आहे. धार्मिक कार्यक्रमांसह देवस्थान आणि पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळ मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा लसीकरण, प्रजनन व बाल अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण उपस्थित होते.
पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नका -
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगल कार्यालये, धार्मिक कार्यक्रमांसह देवस्थान आणि पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. 50 पेक्षा कमी व्यक्तींचा सहभाग, मास्क, सॅनिटायझर आदी सुविधांचा वापर होतो की नाही, याची कसून तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वांनी नियम पाळावेत. जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे पथक -
दिल्ली, गोवा, राजस्थान, केरळ या राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या राज्यातून गावात आलेल्या व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन सर्व ग्राम समित्यांना केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यास जिल्ह्याच्या पत्रादेवी आणि खारेपाटण येथील प्रवेशद्वारावर महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे पथक नेमून तपासणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो -
अमरावती जिल्ह्यासह पुणे, मुंबई या ठिकाणी कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. त्या ठिकाणी लॉकडाऊन सुरू झाले आहे. सिंधुदुर्गात कोरोना रुग्ण वाढत नसले तरी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे आतापासून सतर्क राहिले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता ‘माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम लक्षात घेऊन प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून मास्कचा वापर करणे, गर्दीत जाणे टाळावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोरोना नियंत्रणात ठेवला -
सर्व नागरिकांनी चांगली साथ दिल्यामुळे आपल्या जिल्ह्याने कोरोना नियंत्रणात ठेवला. राज्यात सर्वात चांगले काम सिंधुदुर्गचे आहे. येथील मृत्यूदर हा 2.7 असून राज्याच्या तुलनेत हा कमी आहे. परंतु यापुढे कोरोनाने मृत्यू होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या आहेत. तर कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू देऊ नका, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
धार्मिक स्थळे व अन्य कार्यक्रमाच्या ठिकाणी अचानक भेटी दिल्या जाणार -