सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर काम करणाऱ्या खलाशांमध्ये आढळून आलेल्या गूढ आजाराने मच्छिमारी क्षेत्रात घबराटीचे वातावरण आहे. आजपर्यंत या आजाराने तीन लोक दगावले आहेत. तर चार जणांवर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान या आजाराबाबत आपण जिल्ह्यातील डॉक्टर आणि मुंबईतील तज्ञ डॉक्टर यांच्यात संपर्क आणि चर्चा घडवून आणली असून, हा आजार तत्काळ रोखाण्यासाठी आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
"खलाशांमधील गूढ आजाराने तिघांचा मृत्यू, आपण तज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात"
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर काम करणाऱ्या खलाशांमध्ये आढळून आलेल्या गूढ आजाराने मच्छिमारी क्षेत्रात घबराटीचे वातावरण आहे. आजपर्यंत या आजाराने तीन लोक दगावले आहेत.
मालवण मधील एक खलासी दगावल्यानंतर मालवणमध्ये गेले दोन दिवस मालवण ग्रामीण रुग्णालयाचे पथक थेट समुद्र किनारी जात खलाशांची तपासणी करत आहे. येथे 576 खलाशी काम करतात. तोंड, हात-पाय सुजणे, फिट येणे, उलटी, ताप येणे अशी या आजाराची लक्षणे असून, फक्त हा आजार खलाशांमध्येच दिसून आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यापूर्वी असा आजार नव्हता. सध्या फक्त सिंधुदुर्ग किनारपट्टीवर खलाशांमध्ये पहिल्यांदा हा आजार आढळून आला असून, त्याचे नेमके कारण काय याची कारणे आरोग्य विभाग शोधत आहे. कोरोनाच्या सावटात प्रभावित झालेला मच्छिमारी व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी 20 एप्रिलपासून संधी देण्यात आली आहे. मच्छिमारी व्यवसायावर प्रत्यक्ष अवलंबून असलेली 30 हजार कुटुंब आणि अप्रत्यक्ष अवलंबून असलेली 15 हजार कुटुंब यामुळे सुखावली होती. त्यांना आता खलाशांमध्ये आलेल्या या नव्या आजाराने मच्छिमारी व्यवसाय बंद होईल याची भीती वाटू लागली आहे.
दरम्यान, आज कणकवलीत बोलताना आमदार नितेश राणे यांनी हा आजार फक्त ३ बोटींवर काम करणाऱ्या खलाशांमध्ये दिसून आला असून त्यांना खाण्याच्या तेलातून काही विशिष्ट पदार्थ त्यांच्या पोटात गेल्याने त्यांना हि बाधा झाली असल्याचे ते म्हणाले. हा आजार या ३ बोटींवरील खलाशांच्या व्यतिरिक्त अन्य खलाशांमध्ये नाही. आपण कोल्हापूर आणि मुंबईतील डॉक्टरांच्या संपर्कात आहोत. गेल दोन दिवस या आजाराचा आरोग्य विभाग अभ्यास करत आहे. काहींचे नमुने आम्ही कोल्हापूर येथे पाठवले आहेत असेही ते म्हणाले. हा आजार तत्काळ रोखण्यासाठी आम्ही सज्ज असून, घाबरून जाण्याचे कारण नाही अस ते म्हणाले.