सिंधुदुर्ग - शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल देण्याची घोषणा करत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ मध्ये लक्ष्मी नारायण पेट्रोल पंपावर पेट्रोल वाटपाला सुरुवात केली. या वेळी भाजपा नेते नारायण राणे यांच्या पेट्रोल पंपासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद थोडक्यात शमला आहे.
सामान्य कार्यकर्त्यांना १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल..
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल देण्याची घोषणा करत शिवसेना आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज सकाळी कुडाळ शहरातील शिवसेना कार्यालयात जमले. या ठिकाणाहून हे कार्यकर्ते पायी लक्ष्मी नारायण पेट्रोल पंपावर जात असताना वाटेत नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले.
सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपा आमने सामने.. शिवसेना विरोधात भाजपाची घोषणाबाजी..
कुडाळ शहरात भाजपा नेते नारायण राणे यांचा पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी आधीच भाजपा कार्यकर्ते जमले होते. भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल वाटपाचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही त्यांना रोखलं. दरम्यान या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते आमने सामने येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केलं. यामुळे कोणताही मोठा वाद होऊ शकला नाही. दरम्यान यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कुडाळला पोलीस छावणीचे स्वरूप..
दरम्यान कुडाळ मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आला होता. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल देण्याची घोषणा शिवसेनेने कालच केली होती. यामुळे पेट्रोलच्या खरेदीसाठी कुडाळमध्ये मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे कुडाळ शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.