सातारा : यशवंतराव चव्हाण म्हणजे लोकोत्तर नेता. हिमालयाएवढे त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारा सह्याद्रीचा सुपूत्र. आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती. यशवंतरावांच्या अनेक आठवणींपैकी सरंक्षण मंत्रीपद स्वीकारण्यापुर्वीची एक आठवण खूप महत्वाची आहे. संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त करत माझी तूर्त कोणास सांगू नका, अशी सूचना पंडित नेहरूंनी केली होती. परंतु, पद स्वीकारण्यापुर्वी एका व्यक्तीच्या संमतीची परवानगी यशवंतरावांनी नेहरूंकडे मागितली होती. त्या व्यक्तीचे नाव ऐकून नेहरूंनी देखील सानंद ती अट स्वीकारली होती. ती व्यक्ती होती यशवंतरावांच्या धर्मपत्नी वेणूताई चव्हाण होय.
धर्मपत्नींची घेतली होती परवानगी :हिमालयावर संकट आले तर महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या संरक्षणासाठी धावून जाईल, असे विधान यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजीच्या भाषणात केले होते. त्यानंतर दोनच वर्षात 1962 ला चीनने भारतावर आक्रमण केले. देशापुढे मोठे आव्हान होते. या अभूतपूर्व परिस्थितीत संरक्षण खात्यावर मोठी जबाबदारी आली होती. 6 नोव्हेंबर 1952 रोजी पंडित नेहरूंनी फोन करून आपण संरक्षण खात्याचा पदभार स्वीकारावा, अशी इच्छा यशवंतरावांना कळविली. माझी इच्छा तूर्त कोणास सांगू नका, असे नेहरू म्हणाले. नेहरूंच्या सूचनेवर यशवंतरावांनी आपली धर्मपत्नी वेणूताईंच्या संमतीची अट त्यांच्यासमोर ठेवली. नेहरूंनी यशवंतरावांची ही अट सानंद स्वीकारली. संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यापुर्वी धर्मपत्नीची परवानी घेणारे यशवंतराव चव्हाण हे देशातील एकमेव राजकारणी असावेत.
चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवून एक विक्रम केला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, शेती, उद्योग, सहकार आणि लोकशाहीयुक्त पंचायत राज मुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून गेला. भारतातील सर्वात मोठे आणि प्रगत राज्य, अशी खुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पावती मिळाली.