कराड ( सातारा ) - नदीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी कराडच्या जुन्या कृष्णा पुलावर आलेल्या एका महिलेसह तिच्या लहान मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे लहान मुलाला आणि तिच्या मातेला जीवदान मिळालं आहे. तसेच, त्या महिलेचा संसार देखील त्यांनी सुराला लावून दिला. या कर्तव्यदक्षतेबद्दल महिला कॉन्स्टेबल दीपा पाटील, रेश्मा विटेकर आणि अमोल फल्ले या कर्मचार्यांचे पोलीस अधीक्षकांनी त्यांचा सत्कार केला ( woman and child jump krushna river ) आहे.
नदीत उडी मारत असतानाच पोलिसांनी रोखले - पतीसोबत झालेल्या भांडणामुळे एक महिला लहान मुलाला कडेवर घेऊन आत्महत्या करण्यासाठी कृष्णा नदीवरील जुन्या पुलावर आली होती. त्याचवेळी निर्भया पथक क्रमांक दोनमधील कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. हवालदार दीपा पाटील, रेश्मा विटेकर, अमोल फल्ले हे पेट्रोलिंग दरम्यान तेथून जात असताना त्यांना त्या महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ते तातडीने महिलेजवळ गेले. कडेवर लहान मुलाला घेऊन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारण्याचा प्रयत्नात असतानाच पोलीस कर्मचार्यांनी तिला रोखले.
पतीसोबत भांडण झाल्याने टोकाचा निर्णय - नदीत उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना कर्तव्यदक्षतेने महिलेला रोखून तिला परावृत्त केले. तिची विचारपूस केली. त्यावेळी पतीसोबत झालेल्या भांडणामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्या महिलेने सांगितले. कौटुंबिक वादासारख्या किरकोळ कारणातून एवढा मोठा निर्णय घेतल्याचे ऐकून पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. समजुतीच्या चार गोष्टी सांगितल्या. त्यामुळे त्या महिलेला देखील स्वत:च्या निर्णयाबद्दल खेद वाटला.
पती-पत्नीमध्ये समेट घडवला - पोलिसांनी महिलेच्या पतीला बोलावून घेतले. कौटुंबिक ताण-तणाव आणि त्यावरील सामंजस्यातून मार्गक्रमण कसे करावे, याबद्दल दोघांचेही समुपदेशन केले. त्यामुळे त्या महिलेच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाला. किरकोळ वादानंतर जीवन संपवायला निघालेल्या महिलेसह तिच्या मुलाला पोलिसांमुळे जीवदान मिळाले. निर्भया पथकातील तीन कर्मचार्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, कराडचे डीवायएसपी रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हवालदार दीपा पाटील, रेश्मा विटेकर आणि अमोल फल्ले यांचा सत्कार केला.
हेही वाचा -Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद