सातारा- संपूर्ण महाराष्ट्राला व देशाला हादरवणार्या वाई येथील धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शुक्रवारी (दि. 18 जाने.) ते न्यायालयात उपस्थित होते. यावेळी पोळ याने मंगल यांचा खून करण्यासाठी वापरलेले इंजेक्शन, विषारी औषधाची बाटली, तसेच मंगल यांच्याकडील बॅग न्यायालयात ओळखली.
वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी डॉ. संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगल जेधे यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्या तडफडून मेल्याची माहिती दिली. मंगल जेधेंचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. पोळ याने आनंद व्यक्त करून त्यांच्या अंगावरील सोने व रोकड लुटली, अशी साक्षही तिने दिली. दरम्यान, पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगल यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.
हेही वाचा - राजाला पुरावा मागितलाच तर त्यांनी तो द्यावा - लक्ष्मण माने
शुक्रवारी माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष देताना ज्योती म्हणाली, दि.16 जून, 2016 ला संतोषने मंगल यांच्या खुनाची योजना मला सांगितली होती. त्यासाठी सोने दुप्पट करून देतो, असे मंगल यांना त्याने सांगितले होते. मंगल यांना त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्याकडील सर्व सोने व रोख रक्कम दीड लाख रुपये सोबत घेतले होते. पोळच्या सांगण्यावरून मी 16 जून रोजी पहाटे मंगल यांना माझ्या दुचाकीवरून पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणले होते. त्यानंतर लांबचा प्रवास करायचा असल्याने थकवा न येण्यासाठी इंजेक्शन देतो, असे सांगून पोळने त्याच्याकडील विषारी इंजेक्शन जेधेंना दिले. त्यानंतर त्या तडफडू लागल्यानंतर मी व पोळने त्यांचे हातपाय पकडून धरले व त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोने व त्यांच्या बॅगमधील रोख रक्कम दीड लाख रुपये काढून घेतले.