कराड (सातारा) - पाच भावांपैकी तीन जणांचे कुटुंबच गेले आणि आम्ही दोघी बहिणी वाचलो, असे सांगताना पाटण तालुक्यातील आंबेघर गावातील भूस्खलनात सर्वस्व हिरावलेल्या महिलेला आपले अश्रू लपविता आले नाहीत. तिची कैफियत ऐकून उपस्थितांना देखील गहिवरून आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या महिलेचे सांत्वन करत तिला आधार दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी पूरबाधितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आम्ही तुमचे भाऊ आहोत. सगळे मिळून तुम्हाला सांभाळू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी बुधवारी बाधितांच्या निवारा छावणीला भेट देऊन त्यांच्या समवेत भोजनही केले. विधानसभेेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बुधवारी (दि. 28) पाटण तालुक्याचा दौरा करून आंबेघर, मिरगाव, हुंबरळी येथील भूस्खलनाची पाहणी केली. तसेच बाधितांच्या निवारा छावणीला भेटही दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीला आंबेघर भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतील बाधितांच्या मोरगिरी (ता. पाटण) येथील छावणीला भेट दिली. तीन भावंडाचे कुटुंब भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या बहिणीचा बांध फुटला आणि तिने फडणवीस यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. पाच भावांपैकी तीन जणांचे कुटुंब गेले आम्ही दोघी बहिणी वाचलो, असे सांगताना महिलेच्या भावना अनावर झाल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस देखील भावूक झाले. आम्ही तुमचे भाऊ आहोत. सगळे मिळून तुम्हाला सांभाळू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही बाधित कुटुंबांची विचारपूस केली. आम्ही सगळे नीट करू. पूर्ण लक्ष ठेऊ, असे प्रविण दरेकर यांनी बाधितांच्या कुंटुंबियांना सांगितले.
आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे -
पाटण तालुक्यात अतिवृष्टी आणि भूस्खलनात चार-पाच गावांना जास्त फटका बसला. त्यात मिरगावमधील चाळीस-पन्नास घरे वाहून गेली आहेत. 15 जण वाहून गेले. त्यातील 11 जणांचा मृत्यू झाला आणि चार जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांपासूनची आमची व्यथा आहे. पाटणमधील नेत्यांसह स्वयंसेवी संस्थांमुळे मदत मिळत आहे. परंतु, आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, ही आमची मागणी आहे. आज जरी शासकीय पातळीवर पुनर्वसनाचे संकेत मिळत असले तरी कायमस्वरूपी पुनर्वसन होईल का, याची आम्हाला खात्री नाही. आम्ही आधी धरणग्रस्त होतो आणि आता पूरग्रस्त झालोय. धरणाची उभारणी तिसरा टप्पा, चौथा टप्पा, असे तीनवेळा आमचे पुनर्वसन झाले आहे. हे आमचे चौथे पुनर्वसन आहे. बाधिताच्या घरातील एक माणूस शासकीय नोकरीत घ्यावा, असा निर्णय 50 वर्षापुर्वी झाला. परंतु, अजुनही निर्णयानुसार नोकरी मिळालेली नाही, अशा समस्या बाधितांनी यावेळी मांडल्या.