सातारा - सातारा शहरासह फलटण, उंब्रज व शिरवळमधील धोकादायक गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम जिल्हा पोलीस दलाने केले असून एकाच वेळी 5 टोळ्यांतील 15 जणांना तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईच्या दंडुक्याने गुन्हेगारी क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत.
फलटणमधील आठ जणांचा समावेश
सातारा शहरातील दुचाकी चोरी प्रकरणी प्रल्हाद उर्फ परल्या रमेश पवार (वय 19 रा. केसरकर पेठ), विकास मुरलीधर मुळे (वय 20 रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी मंगळवार पेठ) या टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. फलटण शहरात बेकायदा गाय, म्हैस या जनावरांची कत्तल करणे तसेच बेकायदा वाहतूक करून त्यांची विक्री केल्याप्रकरणी तय्यब आदम कुरेशी (वय 36), हुसेन बालाजी कुरेशी (वय 47), जमिल मेहबूब कुरेशी (वय 42), सुदाम हसीन कुरेशी (वय 27), अरशद जुबेर कुरेशी (वय 25), अमजद नजीर कुरेशी (वय 41 सर्व राहणार फलटण शहर) या टोळीला पूर्ण सातारा जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर या तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. फलटण शहरात गर्दी मारामारी बेकायदा शस्त्र बाळगणे हातभट्टी दारू निर्मिती करणे या प्रकरणी सनी माणिक जाधव (वय 26) व गणेश महादेव तेलखडे (वय 37 दोघेही रा. मलटण, ता. फलटण) या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर या तालुक्यांमधून तडीपार करण्यात आले आहे.
शिरवळ व उंब्रज मध्येही कारवाई
शिरवळमध्ये गर्दी करून मारामारी व उद्योजकांमध्ये दहशत तयार करणाऱ्या संजय तुकाराम धमाल (वय 53), योगेश दादासाहेब ढमाळ (वय 28 दोघेही केसुर्डी ता. खंडाळा) या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्हा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. उंब्रज पोलिसांनी जबरी चोरी व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राकेश उर्फ मुन्ना जालिंदर घाडगे (वय 32 रा. कदममळा उंब्रज) शंकर उर्फ नाना लक्ष्मण शितोळे (वय 29, रा. अंधारवाडी ता. कराड) सोन्या उर्फ अनिकेत अधिक चव्हाण (वय 20 अंधारवाडी) या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्यातून तडीपार केले आहे.
भानगडबाजांवर टांगती तलवार
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी संशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. उलट सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे स्थानिक पोलीस अधिकारी अण्णासाहेब मांजरे, बी.के. किंद्रे, अजय गोरड, उमेश हजारे यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी संशयितांना तडीपार केले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रातील भानगडबाजांचे धाबे दणाणले आहेत. अद्याप प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव प्रलंबित असून आणखी काही जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
हेही वाचा -राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही; शरद पवार-अमित शाह भेटीनंतर अंजली दमानियांचं ट्विट