सातारा- पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहल्याने मासे प्रजननासाठी चढणीचा उलटा प्रवास करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील खवैय्ये नदीकाठांवर गळ टाकून आहेत. त्यामुळे चढणीचे मासे पकडण्यात मोठा धोका आहे. हे मासे पकडल्याने जैव साखळी धोक्यात येत आहे. त्यामुळे चढणीचे मासे न पकडता दोन महिने मासेमारी बंद ठेवावी, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. आमचे प्रतिनिधी शैलेंद्र पाटील यांनी याबाबत घेतलेला हा विशेष आढावा खास आमच्या वाचकांसाठी. . .
का होतो माशांचा अनोखा उलटा प्रवास ?
पावसाला नुकती सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील नद्यांमध्ये गढूळ पाणी वाहत आहे. नदीतील असंख्य मासे प्रजननासाठी उलटा प्रवास सुरू करतात. माशांचा हा उलटा प्रवास साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी स्पष्ट केला आहे. डोंगर, झरे, ओहळ, भाताची खाचरे आणि तात्पुरत्या पाणथळ जागेत हे मासे प्रजननासाठी येतात. शांत पाणी पाहून तेथे ते अंडी घालतात व पुन्हा मागे परततात. या अंड्यातून माशांची पिल्ले जन्म घेतात. वर्षातून एकदाच गोड्या पाण्यातील माशांना निसर्ग अंडी घालण्यासाठी संधी देतो आणि पिल्ले संगोपनासाठी वातावरण निर्माण करून देतो असे ते म्हणाले.
नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या माशांना चढाचे किंवा चढणीचे मासे म्हणतात. गोड्या पाण्यातील माशांना प्रजननासाठी संधी द्यायला हवी. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक सागर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.