महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 11, 2020, 5:53 PM IST

ETV Bharat / state

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश दिला. हा आदेश दुर्दैवी असून राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, असे भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सकल मराठा समाज जो निर्णय घेईल, त्या निर्णयासोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

shivendrasinhraje bhonsle
शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती ही दुर्दैवी असून समाजावर अन्याय करणारी आहे. मराठा आरक्षणासाठी सकल समाज जे पाऊल उचलेल ते सर्वांना मान्य असेल. समाज जो निर्णय घेईल त्याच्याशी एक समाजबांधव म्हणून मी बांधिल आहे. राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी. समाजाच्या निर्णयानुसार आरक्षणासाठी प्रसंगी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार भाजपा

उच्च न्यायालयात जो निर्णय होतो, तो सर्वोच्च न्यायालयात सहसा बदलत नाही. मात्र, मराठा आरक्षणाबाबत असे का घडले, हा खरा प्रश्‍न आहे. सरकारने आपली बाजू नीट मांडली नाही, असेच म्हणावे लागेल, असे मत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. हे सरकार नवीन आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला, मोर्चे काढले. एवढे सगळे करून जर, आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळत असेल तर, खूपच दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा-मराठा आरक्षणाला स्थगिती : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने बोध घ्यावा

मराठा आरक्षण हे इतर समाजाचे आरक्षण कमी करून द्यावे, अशी मागणी नाही आणि तसे घडतही नाही. त्यामुळे समाजा-समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रश्‍न नाही. सरकारने गांभीर्याने लक्ष घालून आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ही सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. मराठा समाज फार मोठा आहे. या समाजातील लोक आर्थिक मागास आहेत. समाजाच्या अनेक अडचणी आहेत. त्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. सकल मराठा समाजाचा जो निर्णय होईल, तो मान्य करून प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी उतरू आणि आंदोलन करू, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, नासीर शेख, धनंजय जांभळे, रवी माने आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details