सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर अखेर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झाले आहे. सातारा लोकसभेचा तिढा सुटला असून उदयनराजे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत उदयनराजेंचे काम करण्याची ग्वाही साताऱ्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत दोघांमधील वादावर पडदा टाकण्यात आला आहे. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्हीही राजेंचे मनोमिलन झाले. उदयनराजे यांच्या कारभारामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. दोन्ही राजेंच्या गटामध्ये मधल्या काळात जोरदार राजकीय संघर्ष झाला होता. त्यातून राष्ट्रवादीच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचे काम न करण्याचा निर्णय शिवेंद्रराजे यांनी घेतला होता. पक्षश्रेष्ठींना तसे कळवण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा साताऱयाचा उमेदवार ठरत नव्हता.