सातारा -पाटण दौर्यावर आलेल्या ठाकरे गटाच्या उपनेते खासदार संजय राऊत यांनी सातार्याचे पालकमंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. लोकनेत्यांचे योगदान आम्ही विसरणार नाही, पण त्यांच्या नातवाने शेण खाल्ले, अशी टीका राऊतांनी केली होती. ही टीका झोंबल्याने पालकमंत्री देसाईंनी शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या नावे पत्रक काढून बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान न थांबविल्यास लोकनेत्यांचे कार्यकर्ते तुमच्या तोंडात शेण घालतील, असा इशारा संजय राऊतांना दिला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत? -लोकनेते बाळासाहेब देसाईंचे यांचे योगदान आम्ही विसरणार नाही. लोकनेत्यांनी काँग्रेसमध्ये असतानाही मराठी माणसांसाठी शिवसेनाप्रमुखांना आणि शिवसेनेच्या भुमिकेला पाठिंबा दिला. मात्र, त्यांच्या नातवाने शेण खाल्ल्याची खरमरीत टीका खा. संजय राऊत यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंवर केली. आजोबांना लोकनेते उपाधी का मिळाली, याचा अभ्यास त्यांच्या नातवाने करावा, असा सल्ला देत शंभूराजेंना अहंकार झाला आहे. ते पालक नव्हे मालकमंत्री झाले आहेत. येत्या निवडणुकीत पाटणची जनता भूकंप घडवेल. शंभूराज देसाईंचा पराभव होईल. तेव्हा जनतेने गाडलेला गद्दार बघायला मी नक्की येईल, असा हल्लाबोल राऊत यांनी केला होता.