सातारा -देशात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच विविध अफवांचे पेव फुटले आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, या अफवेमुळे दोन ते तीन महिन्यांपूर्वी पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. आता अशाच अफवा टोमॅटो पिकाबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टोमॅटोच्या पिकावर विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा पसरली आहे. तथापि, वनस्पतीतज्ज्ञांनी या अफवेचे खंडन केले आहे. वनस्पतीतील विषाणू हे सरळ मार्गी आहेत. म्हणजेच निसर्गाने त्यांना त्यांची विशिष्ट यजमान पिके किंवा त्या पिकांचे गट प्रदान केले आहेत. या यजमान पिकांव्यतिरीक्त हे विषाणू अन्य पिकांत प्रादुर्भाव करत नाहीत. उदाहरणार्थ द्यायचे काकडीतील विषाणू आपल्या पर्यायी यजमान टोमॅटो पिकात प्रादुर्भाव करू शकतो. मात्र, तो मेथी पिकात प्रादुर्भाव करत नाहीत. अगदी याच नियमानुसार हे वनस्पतीवरील विषाणू मानवात संक्रमित होत नाहीत. वनस्पतीजन्य विषाणूने मानवी शरीरात संक्रमण केल्याची घटना आणि शास्त्रीय पुरावा आजतागायत आढळलेला नाही, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोग शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आवाहन डॉ. तानाजी नारुटे यांनी दिली.