महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 29, 2020, 4:09 PM IST

Updated : Jul 26, 2020, 10:10 PM IST

ETV Bharat / state

प्रशासनाचा हलगर्जीपणा; मृतदेहाची हेळसांड झाल्याने वडूज ग्रामीण रुग्णालयात तणाव, नातेवाईक संतप्त

संपत कर्णे यांचा हैदराबाद येथे मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह डिस्कळ येथे आणण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. मात्र, मृतदेह मूळ गाव डिस्कळ येथे आणताना प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतल्याने तब्बल १० तास मृतदेहाची हेळसांड झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

satara
अंत्यसंस्कार करताना कर्मचारी

सातारा- मूळ डिस्कळ येथील रहिवाशी असलेल्या संपत कर्णे यांचा हैदराबाद येथे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा मृतदेह डिस्कळ येथे आणण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. मात्र मृतदेह मूळ गाव डिस्कळ येथे आणताना प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतल्याने तब्बल १० तास मृतदेहाची हेळसांड झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर त्या मृतदेहाचा अंत्यविधी प्रशासनाच्या निर्देशानुसार वडूज येथील स्मशानभूमीत प्रशिक्षीत कर्मचार्‍यांकडून करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, की मृत संपत ज्योती कर्णे ( वय ६५ ) हे हैदराबाद येथे व्यवसाय निमित्त स्थायिक झाले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांची बायपास सर्जरी झाली होती. शनिवारी त्यांना घरी उलटी, धाप असा त्रास जाणवू लागल्याने हैदराबादेतील इरानुमा येथील गव्हर्नमेंट जनरल चेस्ट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रुग्णालयात उपचारपूर्वी ते मृत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

प्रशासनाच्या हलगर्जीपणाने मृतदेहाची हेळसांड

नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह डिस्कळ येथे आणण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या संदर्भात डिस्कळ येथील पोलीस पाटील, सरपंच यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माण तालुक्यातील पिंगळी येथे येऊन थांबा, असे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर बराच वेळ गेल्यानंतर त्यांनी डिस्कळ येथील संबंधीत प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी मृतदेह वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात न्या अशा सूचना केल्या. त्याप्रमाणे तो मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे वडूज ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

बराच कालावधी गेल्यानंतर डिस्कळ येथील संबंधितांनी कोणताच संपर्क नातेवाईकांशी न केल्याने नातेवाईकांनी मृतदेह डिस्कळकडे नेण्याचा निर्णय घेतला. ही बाब पोलीस प्रशासनाला व आरोग्य विभागाला समजताच पोलीस प्रशासनाने पुसेगाव हद्दीत बॅरिकेट लावून ही रुग्णवाहिका अडवली. पुसेगाव व वडूज पोलिसांनी तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत घालून हा मृतदेह पुन्हा अंत्यविधीसाठी वडुजकडे आणला.

या दरम्यान वडूज ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश करत संबंधित प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणाबद्दल व दिवसभर ताटकळत ठेवल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ही नातेवाईकांनी प्रसिद्धिमाध्यमांकडे केली. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने त्या मृतदेहावर वडूज येथील स्मशानभूमीत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सायंकाळी ७ च्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला.

डिस्कळ येथील ग्रामसमितीने तहसील प्रशासनाशी संपर्क साधून हैदराबाद येथील मूळ गाव डिस्कळ येथील मृतदेह घेऊन नातेवाईक येत असल्याची माहिती दिली होती. २१ मे च्या अद्यादेशाप्रमाणे जिथे मृत्यू झाला आहे, त्याच ठिकाणी अंत्यविधी करावा असा शासनाचा अद्यादेश आहे. त्या निर्देशाप्रमाणे आम्ही आमची भूमिका पार पाडली. संबंधित मृताच्या मुलाला याबाबत पूर्व कल्पनाही दिल्याची प्रतिक्रिया सरपंच महेश पवार यांनी दिली. या गंभीर घटनेबाबत तहसीलदार यांच्याशीही मोबाईलवर संपर्क झाला असता या मृतदेहाचा अंत्यविधी वडूज येथे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून व्हावा, असे सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Last Updated : Jul 26, 2020, 10:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details