कराड ( सातारा ) - हातावर पोट असणारे मजूर, शेतकरी, परदेशात असलेल्या महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांची कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत गैरसोय होत आहे. यासोबतच राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची सद्यस्थिती, धान्य वितरण, कृषी अर्थव्यवस्था तसेच कोरोना तपासणीचा खर्च यावर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
कोरोना टेस्टिंगचा खर्च महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करुन तसे आदेश देण्यात यावेत. खासगी डॉक्टर आणि दवाखान्यांना जिल्हाधिकार्यांमार्फत पीपीई किटचे वितरण करावे. मशीनचा वापर न करता धान्य वितरण करण्याचे परिपत्रक आहे. परंतु, अध्यादेश नसल्यामुळे गोंधळ होत आहे. त्यामुळे, या निर्णयाची माध्यमांमधून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील मजुरांकडे शिधापत्रिका नसल्यास त्यांना अंत्योदय योजनेप्रमाणे तीन महिने धान्य दिले जावे. त्याचबरोबर त्यांना आधार कार्डवर बांधकाम मजुरांप्रमाणे महिना २००० रुपये भत्ता देण्यात यावा, या बाबींकडे चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
शेतकर्यांनी मागील कर्जाचे हफ्ते भरले नसले, तरी त्यांना नवीन कर्ज देण्यात यावे. आरबीआयने हफ्ते व व्याज भरण्यासाठी दिलेली तीन महिन्याची मुदतवाढ सहकारी पतसंस्था व विकास सोसायट्यांनाही लागू करावी. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांच्या कर्जाची मुदत तीन महिन्यांवरुन सहा महिन्यापर्यंत वाढवावी. तसेच सहा महिन्यांचे व्याज भरण्याची विनंती केंद्र शासनाला करावी, असेही चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविले आहे.
केबल कंपन्या, वायफायचे दर पुढील तीन महिन्याकरिता कमी करण्यास टेलिकॉम कंपन्यांना सांगावे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील 7 हजार विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्राशी संपर्क साधावा. तसेच कोटा (राजस्थान) येथे 2 हजार विद्यार्थी आहेत. त्यांना परत आणण्यासाठी विशेष बस पाठविण्यात याव्यात, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.