सातारा - साताऱ्याचा खेळाडू पार्थ सुशांत साळुंखे याने युरोप येथील पोलंडमध्ये झालेल्या युवा जागतिक आर्चरी स्पर्धेत भारतीय संघामधून सांघिक आणि मिश्र गटात दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. अशी कामगिरी करणारा तो सातारा जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
साताऱ्याच्या पार्थ साळुंखेची युवा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी देशाला सुवर्णपदकाची भेट
'भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माझ्या संघाने आपल्या देशाला सुवर्णपदकाची भेट दिली आहे' अशी प्रतिक्रिया पार्थ साळुंखे याने दिली.
अमेरिकेत झळकणार साताऱ्याचा पार्थ
अमेरिकेत होणाऱ्या सिनीयर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी त्याला विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
वडिलच त्याचे गुरू
पार्थ साळुंखे हा साताऱ्यातील शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. शिक्षण प्रसारक संस्थेने विकसित केलेल्या आर्चरी प्रशिक्षण केंद्रात तो प्रशिक्षण घेतो. त्याचे वडिलच त्याचे प्रशिक्षक आहेत. श्रीपतराव पाटील हायस्कूलचे ते अष्टपैलू शिक्षक आहेत.
पार्थचा सार्थ अभिमान
या प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले, की 'आमच्या संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल, आदर्श विद्या मंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आणि माणिक कासट बालक मंदिर या चारही शाखांमधून शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. या केंद्रात शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाखांमधून शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. पार्थ साळुंखे आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांनी मिळवलेल्या युवा जागतिक स्पर्धेतील यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे'.
ऑलिम्पिक सुवर्णपदक आणावे
पार्थचे वडिल व आर्चरीमधील मार्गदर्शक सुशांत साळुंखे यांनी पार्थच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. 'पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आम्ही तयारी करत आहोत. देशासाठी त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक आणावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी पार्थ दिवस-रात्र मेहनत करत आहे', असे सुशांत साळुंखे यांनी म्हटले. तर, पार्थची आई अंजली साळुंखे यांनीही पार्थच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला.
हेही वाचा -टोकियो ऑलिम्पिकवीरांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्रेकफास्ट