सातारा - कोरोनाच्या धसक्याने कराड नगरपालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांची समाधी असलेले प्रीतिसंगम उद्यान बंद करण्यात आले आहे. यामुळे कराडच्या कृष्णा घाटावरील कराडकरांची गर्दी भलतीच रोडावली आहे. कोरोनाच्या धास्तीने कराडकरांमध्येही जागृती झाली असून नागरीक स्वयंशिस्त पाळताना दिसत आहेत.
प्रीतिसंगम उद्यान बंद; कृष्णा घाटावरील कराडकरांची गर्दी रोडावली
कोरोनाच्या धसक्याने कराड नगरपालिका प्रशासनाने अलर्ट जारी केला असून स्व यशवंतराव चव्हाण यांची समाधी असलेले प्रीतिसंगम उद्यान बंद करण्यात आले आहे. कोरोना विषाणुच्या धास्तीने कराड मधील नगारीक स्वयशिस्त पाळत आहेत.
प्रीतीसंगम उद्यानात पहाटेपासून कराडकर फिरण्यासाठी यायचे. हास्य क्लबचे सदस्य, मॉर्निक वॉकसाठी येणार्या नागरीकांमुळे उद्यानात पहाटेपासून गर्दी असायची. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेने हे उद्यान बंद केले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात लहान मुलांची उद्यानात गर्दी पहायला मिळायची. उद्यान बंद केल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील लोकांची प्रीतिसंगमावरील उद्यानात होणारी गर्दी रोडावली आहे. उद्यानातील खेळण्यांचा वापर करता येत नसल्याने लहान मुलांचा हिरमोड झाला आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने उद्यान बंद करण्याचा नगरपालिकेचा निर्णय योग्य असल्याचीही भावना कराडकरांमध्ये आहे
प्रीतिसंगम उद्यानात जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. बागेत नगरपालिकेचे कर्मचारीही तैनात आहेत. त्यामुळे उद्यान ओस पडले आहे. या संदर्भात नगरपालिकेने नागरीकांना आवाहन करून सार्वजनिक गर्दी टाळून सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे. कोरोनासारख्या व्हायरसमुळे कराडकरांनीही नगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. कृष्णा घाटावर अनेक देव-देवतांची मंदीरे आहेत. त्या ठिकाणी दैनंदीन पूजा करण्यास मात्र प्रतिबंध करण्यात आलेला नाही.