कराड (सातारा) : जखमी वन्यजीवांवरील उपचार व देखभालीसाठी कराड तालुक्यातील वराडे येथे अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी वर्ग झाला आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांना तातडीने उपचार मिळणार आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी वराडे (ता. कराड) येथे पश्चिम महाराष्ट्रातील जखमी वन्यजीवांवरील उपचारासाठी सुसज्ज वन्यजीव उपचार केंद्र मंजूर व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता.
वन्यजीव उपचार केंद्रात रेडिओथेरपी, पोर्टेबल एक्स-रे यासारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. याठिकाणी मांसभक्षी प्राणी-पक्षी, तृणभक्षी प्राणी-पक्षी, तसेच जलचर प्राण्यांसाठी वेगवेगळ्या पिंजऱ्यांची व्यवस्था असणार आहे. नैसर्गिक अधिवासाशी मिळते जुळते वातावरण तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी वन्यजीवांच्या उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्याची घोषणा केली होती.