सातारा - 'दुष्काळग्रस्त माणमध्ये ५१ पैकी २१ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित २० छावण्या ४८ तासात सुरू केल्या जातील. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा. मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायच मी बघतो. नवीन दहा गावांसाठी सक्षम संस्थांना बोलवून चारा छावण्या सुरू करण्यास सांगितले जाईल', असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. माण तालुक्याच्या दौऱ्यावर असताना प्रशासकीय अधिकारी, चारा छावणी चालक, शेतकरी यांच्याशी शिवतारे यांनी संवाद साधला.
जनावरांना प्रथम प्राधान्य द्या. इतर गोष्टी दुय्यम आहेत. छावण्या सुरू होणे ही शासनाची जबाबदारी आहे. जाचक अटी न ठेवता लवकर छावण्या कशा सुरू करता येतील ते पाहा. चारा छावणीचालक ४ दिवसात ४ छावण्या सुरू करू शकत नसेल तर त्याची परवानगी काढली जाईल. त्यांच्या जागी दुसऱ्या छावण्यांना परवानगी दिली जाईल. छावणी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून अनुदान देण्यात येईल, असे शिवतारे म्हणाले.