महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 7, 2021, 5:03 PM IST

ETV Bharat / state

सातारा : अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल

पिकांची अवस्था चांगली असतानाच पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. वाऱ्यामुळे रब्बी ज्वारी आडवी झाल्यानेही नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने नुकसान
अवकाळी पावसाने नुकसान

सातारा -जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे स्ट्राॅबेरी, द्राक्षांसह पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण सकाळपासून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.


जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. माण तालुक्यातील म्हसवड परिसरात हलक्या स्वरुपात पाऊस झाला. त्यानंतर खटाव, सातारा, महाबळेश्वर, कोरेगाव तालुक्याही पावसाचा शिडकाव झाला. ढगाळ वातावरण व हलका पावसामुळे शेतातील कामे ठप्प झाली होती. माण तालुक्यात अनेक ठिकाणी वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिके आडवी झाली आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्याचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. पिकांची अवस्था चांगली असतानाच पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. वाऱ्यामुळे रब्बी ज्वारी आडवी झाल्यानेही नुकसान झाले आहे.

हेही वाचा-ग्रामपंचायत निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाचा केविलवाणा प्रयत्न - अजित पवार

पिकांच्या वाढीवर परिणाम

पावसामुळे आंब्याचे मोहर झडण्याबरोबर वेलवर्गिय पिकांना भुरी, गहू, हरभरा पिकांवर तांबेरा तर टोमॅटोवर करपाच्या प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


हेही वाचा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत; मनोहर जोशींची घेतली भेट


फळबागांना फटका

पावसाचा व प्रतिकूल वातावरणाचा जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यात द्राक्ष पिकाला फटका बसला आहे. द्राक्षांवर भुरी, घडकुज, दावण्या आदी रोगांचा प्रादुर्भाव भीती निर्माण झाल्याने फवारण्याकडे कल वाढला आहे. खटाव तालुक्यातील कलेढोण, मायणी, तरसवाडी, पाचवड, गारळेवाडी, मुळीकवाडी, हिवरवाडी, विखळे, शिंदेवाडी (कलेढोण), कानकात्रे व अनफळे परिसर निर्यातक्षम द्राक्ष पिक घेतले जाते. या ठिकाणचे बहुतांशी शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतात. मात्र गेल्या काही दिवसापासून अवेळी येणारा पाऊस, सातत्याने बदलणारे हवामान, ढगाळ वातावरण, धुके, कडाक्‍याची थंडी आदी संकटाना सामोरे जावे लागत आहे.

सद्यःस्थितीत काही बागा फ्लॉवरिंग स्टेजला आहेत. तर काही बागांचे डिपिंग चालू आहे. काही बागा शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत. अशा विविध टप्प्यांवर आलेल्या बागांना अचानक बदललेल्या प्रतिकूल वातावरणाचा फटका बसण्याची भीती आहे.

द्राक्ष पिक घटण्याची भिती

धुके व थंडीमुळे द्राक्षांवर भुरी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता आहे. ऊन व वारा नसल्याने पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे फ्लावरिंगमधील बागांना घडकुज होण्याची भिती निर्माण झाली आहे. द्राक्ष मण्यास तडे जाण्याचेही प्रकार सुरू आहेत. द्राक्ष घडात पाणी साचून कुजवा रोग, द्राक्षास तडे जात असल्याने उत्पन्नात किमान 40 टक्के घट होणार आहे, अशी माहिती पळसावडेचे नानासाहेब पोळ यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details