सातारा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेतील वीर सरदार असलेले तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिटकडे वाटचाल याने वाटचाल केली, तर तेच दुसरीकडे तान्हाजी मालुसरे यांचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली हे मुळगाव आजही विकासापासून दुर्लक्षित आहे. याचमुळेच गोडवलीचे ग्रामस्थ या चित्रपटावरही नाराज आहेत.
गोडवली हे गाव पाचगणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर, टेबल लँडच्या कुशीत वसलेले आहे. या गावात आजही सुमारे ७० टक्के कुटुंबे मालुसरे आडनावाची आहेत. गावात प्रवेश केल्यानंतर मध्यावर, वस्तीत मोकळे पटांगण दिसते. त्याला 'तानाजीचं परडं' असंही पडनाव आहे. याच जागेत पूर्वी तान्हाजी मालुसरे यांचे घर होते, असे गावातील वडीलधारी मंडळी सांगतात. ग्रामस्थांच्या पुढाकाराने पूर्वीच या ठिकाणी तान्हाजी मालुसरे यांचा अर्धाकृती पुतळा बसवला आहे.
हेही वाचा -'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - हसन मुश्रीफ
इतिहासाचे अभ्यासक दत्ताजी नलवडे (रा. निगडे मोसे, ता. वेल्हे जि.पुणे) यांनी तान्हाजी मालुसरे यांचे गाव पुराव्यानिशी शोधून तान्हाजींवर पुस्तक लिहिले आहे. 'उमरठ ही तान्हाजी मालुसरे यांची कर्मभूमी तर गोडवली ही त्यांची जन्मभूमी आहे. त्यांचे बालपण याच गावात गेले. लहान वयातच त्यांचे वडील काळोजीराव मालुसरे निर्वतले. त्यांच्याकडे गावची पाटीलकी होती. तान्हाजी त्यावेळी 8-9 वर्षांचे तर त्याचा धाकटा भाऊ सुर्याजी 7 वर्षांचा असावा. सख्खे मामा शेलारमामा यांनी दोघांची जबाबदारी स्वीकारली आणि दोघांनाही घेऊन ते प्रतापगडाच्या पायथ्याला कुडपन या गावी गेले. शेलारमामांकडे काही काळ राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तान्हाजींना गोडवलीची पाटीलकी दिली. तान्हाजी पुन्हा गोडोलीत गेले. नंतर त्यांना कोकण प्रांताची सुभेदारी देण्यात आली. त्याकाळात ते उमरठ येथे राहिले', अशी माहिती नलवडे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दिली.