सातारा :माण तालुक्यातील मलवडीमध्ये सराफ व्यावसायिकाला फिल्मी स्टाईलने लुटणार्या गुन्ह्याचा पर्दाफाश ( Goldsmith turned out to be the mastermind ) झाला आहे. म्हसवडमधील एक सोनारच गुन्ह्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार निघाला असून सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 435 ग्रॅम सोन्यासह सुझुकी कार, स्प्लेंडर मोटारसायकल, पिस्टल, चाकू असा एकूण 17 लाख 83 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुर्वां उर्फ दुर्योधन नाना कोळेकर वय 34, रणजित भाऊ कोळेकर वय 20, राहणार धुळदेव, तालुका माण, योगेश तुकाराम बरडे वय 35, राहणार पिलीव रोड बरडे वस्ती माळशिरस, जिल्हा सोलापूर आणि रामदास विठ्ठल गोरे वय 20, राहणार म्हासाळवाडी, तालुका माण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मोटरसायकलवरून घरी जाताना लुटला होता ऐवज :मलवडी येथील श्रीकांत तुकाराम कदम आणि त्यांचा पुतण्या श्रीजित शिवाजी कदम हे रविवार, दि. 25 रोजी सराफी दुकान बंद करून दुकानातील सोने, चांदीचा ऐवज आणि 7 लाखाची रोकड असलेल्या तीन पिशव्या घेऊन सायंकाळी पावणे आठच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी निघाले होते. म्हसवड-माळशिरस मार्गावरून जात असताना अचानक दोघांनी मोटारसायकलला धक्का देत त्यांना खाली पाडले. पिस्टलचा धाक दाखवत पिशव्यांमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटून पलायन केले होते. या झटापटीत एका संशयिताला पकडण्यात यश आले होते. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून म्हसवड पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संयुक्तरित्या तपास करत होते.