सातारा - मदत करण्याऐवजी मार्केटिंगवरच सरकारचा जोर आहे. त्याऐवजी सरकारनं तातडीनं पूरग्रस्तांकडे लक्ष देऊन त्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. लातूर येथील भूकंपानंतर ज्या पध्दतीने आठ महिन्यात एक लाख घरे पक्की बांधून दिली त्याप्रमाणे पुरात संपूर्ण किंवा 50 टक्के गाव पाण्यात गेले आहे, अशा ठिकाणी घरे बांधून देणे शक्य आहे का? अशी विचारणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना केली. त्याचवेळी घरे जुन्या जागेवर की, नव्या जागेवर बांधायची हा प्रश्न असून कोल्हापूर, सांगली, कऱ्हाडमध्ये नवीन गावठाणासाठी जागा मिळणे तितके सोपे नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, पुराचा फटका बसलेल्या गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जेमाफ करण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे पवार म्हणाले.
'मदत करण्याऐवजी मार्केटिंगवरच सरकारचा जोर, तातडीनं पूरग्रस्तांना कर्जमाफी करा'
पुराचा फटका बसलेल्या गावांची कर्जमाफी करावी. शेती, व्यवसाय, बलुतेदारांची कर्जेमाफ करण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे शरद पवार म्हणाले.
सांगली, सातारा भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्यात आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रोहित पवार उपस्थित होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आदी उपस्थित होते.
शरद पवार यांनी कराड उत्तरचे आमदार पाटील यांच्याकडून पूर स्थितीची माहिती घेतला. यावेळी सांगली, कोल्हापूरला मदत पाठवण्यासाठी कऱ्हाड हेच केंद्र करावे असे पाटील यांना सांगितले. त्यासाठी जागा आहे का? अशी विचारणा केली. आमदार पाटील यांनी जागा असल्याबाबत होकार दिला. त्यावर आमदार शिंदे यांनी सह्याद्री कारखान्यावर ठेवता येईल असे सूचवले. पवार म्हणाले, जयंत पाटील यांनीही राजारामबापू कारखान्यावर मदत पाठवण्यास सांगितले आहे. त्यानुसार शक्य असल्यास येणारी मदत सह्याद्री कारखाना किंवा कऱ्हाडमध्ये ठेवा. पुराचे पाणी ओसरल्यावर मदत सांगली, कोल्हापूरला लवकर देणे शक्य होईल.
घरांना ओल आहे, त्यांची अवस्था काय आहे, हे पहावे लागेल असे पवार म्हणाले. पुरात पाण्याखाली गेलेली मातीची घरे पडणार हे नक्की असल्याचे उपस्थितांनी पवार यांना सांगितले. त्यावर पवार यांनी लातूरच्या भूकंपाची आठवण करून देत भूकंपानंतर तेथे ज्या पध्दतीने आठ महिन्यात एक लाख घरे पक्की बांधून दिली. त्यानुसार पुरात संपूर्ण किंवा 50 टक्के गाव पाण्यात गेले होते, त्या ठिकाणी घरे बांधून देणे शक्य आहे का? अशी विचारणा केली. त्याचवेळी घरे जुन्या जागेवर की नव्या जागेवर बांधायची हा प्रश्न उपस्थित करून कोल्हापूर, सांगली, कऱ्हाडमध्ये नवीन गावठाणासाठी जागा मिळणे तितके सोपे नाही, त्यामुळे आहे तिथेच जागा शोधणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.