कराड (सातारा) -कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाचा आज ड्राय रन झाला. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शर्थीने प्रयत्न केले. माझं कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबवून कोविडवर नियंत्रण मिळवले. आता लस येण्याचा टप्पा जवळ आला असून, प्रशासनाने त्याचे योग्य नियोजन सुरु केले आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून ड्राय रन घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले.
कराडमध्ये कोरोना लसीकरनाचे ड्राय रन
कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचे ड्राय रन पार पडले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी कोरोना लसीकरनादरम्यान घ्यावयाच्या काळजीसंदर्भात रंगीत तालीम पार पडली.
लस जनतेला देणे आव्हानाचे काम
कोविडवर लस तयार करण्यासाठी जगातील सर्व देशांनी प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सीरम इन्स्टिट्यूटने देखील लस तयार केली. आता ही लस देशातील सर्व जनतेला देणे आव्हानाचे काम आहे. त्यामुळे सुरुवातीला वैद्यकीय सेवा देणार्यांना, त्यानंतर पोलीस, महसूल विभागाच्या लोकांना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांना याची माहिती व्हावी, म्हणून आज ड्रायरन घेण्यात आला आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ज्यांना एसएमएस जाईल, त्यांनी रूग्णालयात येऊन लस घ्यायची आहे. लस दिल्यानंतर 30 मिनिटे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. लसीकरण निश्चित यशस्वी होईल आणि कोविडवर मात करू शकू, असा सरकारला विश्वास असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्यासह अधिसेविका व परिचारीका उपस्थित होत्या.