महाराष्ट्र

maharashtra

खते-बियाणे वाटपाचे नियोजन आणि टोळधाड प्रतिबंधात्मक उपाय शेतकऱ्यांना सांगा- जिल्हाधिकारी

सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत त्यांनी खते व बियाण्यांचे वाटप नियोजन आणि टोळधाड प्रतिबंधात्मक उपाय शेतकऱ्यांना सांगावेत, अशा सूचना कृषी विभागाला दिल्या.

By

Published : Jun 4, 2020, 12:57 PM IST

Published : Jun 4, 2020, 12:57 PM IST

Collector order to inform farmer about seed and fertilizer
खते-बियाणे वाटपाचे नियोजन शेतकऱ्यांना सांगावे- जिल्हाधिकारी

सातारा -जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. खते व बियाणांच्या वाटपाचे योग्य नियोजन करावे. टोळधाड या किडीच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांना सामुहिक प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी कृषी विभागाने टोळधाड किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कृषी विभागाला दिल्या.

सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

खतांच्या बाबतीमध्ये युरियासाठी मागणी तुलनेने जास्त प्रमाणात आहे. जूनच्या पहिल्या आठवडयात जिल्ह्यास 3 हजार 700 मे.टन युरिया उपलब्ध होणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवडयात 3 हजार मे.टन युरिया उपलब्ध होईल. जिल्ह्यात सद्यस्थितीत युरिया व इतर सर्व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, असेही शेखर सिंह यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत बांधावर खत व बियाणे वाटप मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यात बुधवारपर्यंत 933 शेतकरी गटांमार्फत 4073.80 मे.टन खते व 1975.23 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहे. पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा. सद्यस्थितीत 3404.31 क्विंटल बियाणे विक्रीसाठी शिल्लक आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी बैठकीत सांगितले.

सन 2020-21 या वर्षामध्ये मका पिकासाठी 114, सोयाबीनसाठी 175, भात पिकासाठी 69, ऊस पिकासाठी 40 अशा एकूण 398 शेतीशाळा आयोजित करण्याचे नियोजन केलेले आहे. सद्यस्थितीत शेतीशाळांचा पहिला, दुसरा वर्ग सुरू असून यामध्ये शेतकरी निवड, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा वापर, सोयाबीन यासारख्या पिकांसाठी घरच्या बियाण्यासाठी उगवणक्षमता तपासणी, बुरशीनाशके, कीटकनाशके, बीजप्रक्रिया इ.बाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांनी सांगितले.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कृषी विभागाच्या सहकार्यातून विक्री करण्यात आला. 442 गटांच्या माध्यमातून 37683 क्विंटल भाजीपाला व 25417 क्विंटल फळे यांची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली. टोळधाड किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास एच.टी.पी. पंपाद्वारे किंवा अग्निशमन यंत्रणेमार्फत कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा प्रशासनामार्फत सज्ज ठेवण्यात आली आहे, असेही प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राऊत यांनी या बैठकीत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details